ही तरुणी गुरुवारी दुपारी घराबाहेर पडली ती पुन्हा परतलीच नाही. तिची हत्या झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाल्यानंतर उरणमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मागील दोन दिवसांपासून शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी निषेध मोर्चा काढून दोन दिवसांत आरोपीला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार श्रीरंग बारणे, सचिन अहिर, आदिती तटकरे यांनी मृत तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आपल्या मुलीची हत्या संशयित आरोपी दाऊद शेखनेच केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी यावेळी केला. या तरुणीच्या हत्येचा गुन्हा जलदगती न्यायालयात चालवण्याची व संशयित आरोपी दाऊद शेखवर ‘ॲट्रोसिटी’अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सोमय्या यांनी यावेळी नमूद केले. ‘दाऊद आणि त्याच्या साथीदारांना अटक करून अंतिम शिक्षा होईपर्यंत तुरुंगाबाहेर जाऊ दिले जाणार नाही’, असे वचन तिच्या कुटुंबीयांना देतानाच हे ‘लव्ह जिहाद’चे गंभीर प्रकरण असल्याचे सोमय्या म्हणाले.
‘लाडकी बहीण असुरक्षित’
‘मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेचा गवगवा करणारे सरकार महिलांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरले आहे. राज्यातील सरकार मजबूत नाही, त्यामुळे कायदा मजबूत नाही. परिणामी महिलांवरील अत्याचाराचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. लाडकी बहीण फक्त पोस्टरवर मर्यादित ठेवणाऱ्या या पोस्टर सरकारच्या कार्यकाळात राज्यात लाडकी बहीण सुरक्षित राहिलेली नाही’, असे टीकास्त्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सोडले.