मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचा यंदाचा पीक पाहणी अहवाल सादर करण्यात आला असून, या अहवालात ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार राज्यात १ जून ते २९ जुलै या कालावधीत सरासरीच्या तुलनेत १३० टक्के पाऊस पडला असल्याची नोंद करण्यात आली. सोमवारपर्यंत एकूण १३६ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाच्या पीक पेरणी करण्यात आली आहे. हे प्रमाण ५ वर्षांच्या तुलनेतील सरासरी लक्षात घेता हे प्रमाण १२८ टक्के आहे.
अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्गातील भाताचे पीक बाधित झाले असून, सुमारे १४४०.४० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रायगड जिल्ह्यातील ३०२७.८१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, तेथेही भाताचे पीक बाधित झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे ११ हजार १६३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, येथील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, केळीची पीके बाधित झाली आहेत. गडचिरोली येथील ११ हजार ४८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, येथील भात, कापूस, सोयाबीन, तूर आणि भाजीपाल्यांची पिके बाधित झाली आहेत.
सर्वाधिक पेरणी तेलबियांची
पीक पाहणी अहवालानुसार राज्यात २९ जुलैपर्यंत पीकनिहाय खरीप पेरणीची आकडेवारी लक्षात घेता सर्वाधिक तेलबियांची ११६ टक्के पेरणीची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ कापसाची ९६ टक्के, अन्नधान्य ७८ टक्के आणि तृणधान्य ७३ टक्के असे पेरणीचे प्रमाण नोंदवले आहे. हेक्टरनुसार राज्यात ५०.९ लाख हेक्टर जागेवर तेलबियांची पेरणी नोंदविली आहे. त्यापाठोपाठ अन्नधान्य ४३.९ लाख हेक्टर, कापूस ४०.५ लाख हेक्टर आणि तृणधान्य २५.२ लाख हेक्टर प्रमाण असल्याचे या अहवालानुसार समोर आले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी १५६ लाख शेतकरी
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत २९ जुलैपर्यंत १५६ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. तर राज्यातील एकूण १०४ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित असल्याची माहिती पुढे आली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत आहे.