राज्यात दररोज अपघाताच्या नवनवीन घटना समोर येत असून भरधाव कारचालकांच्या चुकीमुळे नागरिक अपघातात आपला जीव गमावत आहेत. अशीच काहीशी एक घटना विरार परिसरात घडली आहे. भरधाव कार चालकाच्या धडकेत पायी जाणाऱ्या एका प्राध्यापिकेला आपला जीव गमववा लागला आहे.
पायी जात असताना मागून कारची धडक अन् प्राध्यापिका दुभाजकावर जाऊन आदळल्या
विरार परिसरातील गोकुळ टाऊनशिप येथील रहिवासी असलेल्या आत्मजा कासट (वय ४५) या विरार येथील विवा कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिक म्हणून कार्यरत होत्या. महाविद्यालय सुटल्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्या नेहमीप्रमाणे आपल्या गोकुळ टाऊनशिप येथील घराकडे पायी चालत निघाल्या होत्या.
आत्मजा कासट या पायी चालत जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव फॉर्च्यूनर कारने त्यांना जोरदार धडक दिली. भरधाव कारच्या धडकेत आत्मजा कासट दुभाजकावर फेकल्या गेल्या. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. विरार येथील मुलजीभाई मेहता शाळेनजीक गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या आत्मजा कासट यांना उपचारासाठी आगाशी रोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री उशिरा आत्मजा कासट यांचा मृत्यू झाला आहे.
या अपघात प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात भरदाव कार चालविणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम पाटील (वय २४) असे कार चालकाचे नाव असून त्याला अर्नाळा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.