कल्याणच्या सहजानंद परिसरात भरदिवसा रहदारीच्या वेळी एकाएकी हे भलेमोठे होर्डिंग कोसळले. ते कोसळताच रस्त्यावरील नागरिकांची आणि वाहनचालकांची एकच धावाधाव झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच काही वेळासाठी वाहतूक कोंडी देखील झाली होती. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
ऐन रहदारीच्या वेळी होर्डिंग कोसळल्याने अनेक गाड्या खाली दबल्या गेल्या. परिणामी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्याचा वाहनचालकांना मोठा फटका बसला आहे. सहजानंद हा परिसर वर्दळीचा येथे अनेक दुकाने असून एक रुग्णालय देखील आहे. त्यामुळे ऐन रहदारीच्या वेळी होर्डिंग कोसळल्याने महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान या घटनेनंतर नागरिक आक्रमक झाले आहेत तर मनसे कार्यकर्त्यांनी देखील महापालिकेविरोधात आंदोलन छेडले आहे. सहजानंद चौकात ठिय्या देत मनसैनिक आंदोलन करत आहेत. जोपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिका या सर्व घटनांवर अधिकृत तोडगा काढणार नाही, तोपर्यंत जागेवरुन हलणार नसल्याची भूमिका मनसैनिकांनी घेतली आहे.