मोहोळ येथील अप्पर तहसील कार्यालय राजन पाटील यांच्या गावात म्हणजेच अनगर येथे स्थलांतर झाले आहे, तो देखील मुद्दा ऐरणीवर आला. यावरुन अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांच्यामुळे मोहोळमधील अप्पर तहसील कार्यालय अनगर गावात गेले, अशा घोषणा देत जिल्हा नियोजन बैठकीत निषेध करत राडा झाला. विशेष म्हणजे सत्तागटातील नेत्यांत खडाजंगी पाहायला मिळाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
सत्ता गटातील नेत्यांत आणि आमदारात हमरीतुमरी
मोहोळ तालुक्यातील अप्पर तहसील कार्यालय राजन पाटील यांच्या गावात मंजूर झाल्याने मोहोळमध्ये अनेक दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत. एकनाथ शिंदे गटाचे चरणराज चवरे आणि मोहोळ तालुक्याचे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांच्यात शाब्दिक चकमक झाली. शाब्दिक चकमक टोकाला जात दोघे हमरीतुमरीवर आले होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी अजित पवार गट राष्ट्रवादीच्या आमदारांचा निषेध करण्यात आला.
आमदार यशवंत मानेंना एकेरी भाषेत बोलल्याने प्रचंड गोंधळ
आमदार यशवंत मानेंकडे पाहून एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख या आमदार यशवंत मानेंमुळेच मोहोळमध्ये ही अवस्था झाल्याचा थेट आरोप करत एकेरी उल्लेख केला. आमदार माने यांनी ‘ये चरण’ असे म्हणताच शिवसेना शिंदें गटाचे नेते मनिष काळजे यांनी चवरे यांची बाजू घेऊन माने यांचा निषेध नोंदवला तर तिकडून यशवंत माने यांच्या बाजूने जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांनी चवरे यांना शिंगावर घेतले. यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला, अरे तुरेची भाषा वापरत हमरीतुमरी झाली.