बारामती तालुक्यातील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून बारामती तालुक्यातील बोरकरवाडी तलावात बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचवण्याच्या कामाचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.
लाडकी बहीण योजनेची विरोधकांकडून बदनामी आणि अपप्रचार
अंतरिम अर्थसंकल्पाच्या माध्यमातून गरीब वर्गाला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी केला आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली गेली. ही योजना देखील खूप लोकप्रिय झाली आहे. काही जणांना हे आवडलेलंच नाही. त्यामुळे ते बदनामी आणि अपप्रचार करत आहेत, असा टोलाही पवारांनी विरोधकांना लगावला.
ते पुढे म्हणाले, मी अनेक ठिकाणी भेटणाऱ्या माता-भगिनींना विचारत असतो. आपण अर्ज वगैरे केलेत का? या योजनेच्या माध्यमातून गरीब वर्गातील माता-भगिनी, मुलींना मदत करण्याचा आमचा हेतू आहे. या योजना आपल्याला पुढे देखील चालू ठेवायच्या आहेत. मात्र विरोधक आमच्यावर वेगवेगळे आरोप करतात.
उद्या लोकांच्या दारात गेलो तर…
या योजना म्हणजे चुनावी जुमला आहे. मी या राज्याचा दहा वर्ष अर्थमंत्री होतो आणि आहे. त्यामुळे राज्याच्या कोणत्या योजनेला किती निधी द्यायचा याचं सारं गणित आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे हा निर्णय आम्ही विचारपूर्वक घेतलेला आहे. त्यामुळे जर फसवाफसवी केली आणि आम्ही उद्या लोकांच्या दारात गेलो तर काहीही थापा मारतो, असं आम्हाला म्हणतील.