फिनले मिलच्या श्रेयावरुन जोरदार खडाजंगी, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांसमक्ष राणा-कडू आमने-सामने

म. टा. वृत्तसेवा, अमरावती : अचलपूर येथील फिनले मिल सुरू करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मिळाल्यानंतर श्रेयवादावरून आमदार रवी राणा व आमदार बच्चू कडू यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित दोन्ही आमदारांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे रविवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्रिशक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीस खासदार बळवंत वानखडे, आमदार बच्चू कडू, आमदार रवी राणा, आमदार अॅड. यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते. यावेळी आमदार रवी राणा यांनी उभे होऊन चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केले. अचलपूर येथील फिनले मिल गत अनेक वर्षापासून बंद असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २० कोटी रुपये मंजूर केल्यामुळे मिल पुन्हा सुरू होत आहे, असे ते म्हणाले. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी यास विरोध केला. तुमच्या खासदारकीच्या काळात मिलसाठी किती निधी आणला, याशिवाय बडनेरा मतदारसंघातील मिलचा प्रश्न सुटला काय असा प्रश्न त्यांनी केला. यामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला होता.
Anil Deshmukh: अनिल देशमुखांविरोधात भाजपची होर्डिंगबाजी; ‘वसूली बुद्धी’ म्हणून हिणवलं, नागपुरात गुन्हा दाखल
बैठकीचे अध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक शांततेने सुरू आहे. त्यामुळे दोन्ही आमदारांनी शांततेने व संयमाने बोलावे असे सुचविले. फिनले मिलच्या श्रेयावरून आमदार राणा यांनी अचानकपणे विधान केल्याने बच्चू कडू यांनी देखील पलटवार केला. त्यामुळे बैठक काही वेळाकरिता राजकीय आखाडा झाली होती.

बडनेरा मतदारसंघातील विजय मिल व अन्य एक मिल बंद आहे. यासाठी राणा दाम्पत्याने कोणतेच प्रयत्न केले नाही. परंतु, आपण सातत्याने फिनले मिलसाठी पाठपुरावा करीत असून त्याचे श्रेय मात्र ते घेत आहेत.

आमदार बच्चू कडू

फिनले मिलचे कामगार अनेक वर्षांपासून बेरोजगार असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. माजी खासदार नवनीत राणा व आपण स्वतः या मिलसाठी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.

आमदार रवी राणा

‘लाडकी बहीण’समितीतून डावलल्याने आमदार यशोमती ठाकूर संतप्त

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या समितीमधून आपणास डावलण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. रविवारी जिल्हा नियोजन भवन येथे पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्ला चढविला. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी ठरविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी एक समिती गठीत केली आहे. समितीत काही अधिकारी व भाजपाचे कार्यकर्ते आहे. परंतु महिला आमदार असूनही आपल्याला डावलण्यात आल्याचा आरोप आमदार ठाकूर यांनी केला. ‘आम्ही तुमच्या लाडक्या बहीण नाही काय’, असा संतप्त सवालही त्यांनी केला. विशेष म्हणजे आमदार सुलभा खोडके त्या समितीवर असल्या तरी त्यांनीही आमदार यशोमती ठाकूर यांना समर्थन दिले. विरोधी पक्षाच्या आमदारांचा जिल्हा प्रशासन व शासनाकडून सातत्याने अपमान केल्या जात असल्याचेही ठाकूर यांनी सुनावले. संतप्त झालेल्या यशोमती ठाकूर यांची यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबतही शाब्दिक चकमक उडाली.
Mahayuti: मैत्रीदिनीच भिडले महायुतीतील मित्र; मुंबई-गोवा महामार्गावरुन शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप

नियोजन अधिकाऱ्यांनी निधी अडविल्याचा आरोप

जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित म्हस्के यांनी ५० कोटी रूपयांचा निधी अडवून ठेवल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांनी बैठकीत बोलताना केला. तसेच म्हस्के यांच्या कार्यालयाद्वारे आर्थिक देवाणघेवाणही होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडून निधीसाठी अडवणूक केल्या जात असल्याचा आरोप सर्वच आमदारांनी केला. त्यामुळे बैठक वादळी ठरली. म्हस्के यांचे निलंबन करण्यात यावे किंवा त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर, आमदार देवेंद्र भुयार, आमदार बच्चू कडू यांनी केला. मात्र सदर निधी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात आल्याने तो वितरित करण्यासाठी विलंब झाल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले. याशिवाय अंबानाल्याला सुरक्षा भिंतीसाठी निधी देण्याची मागणी आमदार सुलभा खोडके, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रशांत डवरे आदींनी केली.

Source link

amravati breaking newsBachchu KaduBJP vs Praharcredits for amravati finlay millRavi Ranaअमरावती जिल्हा नियोजन समितीअमरावती बातम्याआमदार बच्चू कडूभाजपा विरुद्ध प्रहार खडाजंगीरवी राणा
Comments (0)
Add Comment