सागरी किनारा मार्गावरुन नवा वादंग; मोकळ्या जागांबाबत भाजप-ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप

मुंबई : मुंबई सागरी किनारा मार्गावरून भाजप आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात सोमवारी जुंपली. आमदार आदित्य ठाकरे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतल्यानंतर आरोप-प्रत्यारोप रंगले. सागरी किनारा मार्गालगतच्या मोकळ्या जागांमध्ये महापालिकेने भाजपच्या कंत्राटदार मित्रांच्या फायद्यासाठी होर्डिंग्ज मंजूर केले असून, त्याची चौकशीची मागणी ठाकरे यांनी केली. तर, सागरी किनारा परिसरात भराव टाकून निर्माण होणाऱ्या जागेत कोणतेही व्यावसायिक बांधकाम होणार नाही, असे प्रतिज्ञापत्र न देणाऱ्यांची चौकशीची मागणी करतानाच होर्डिंग्ज उभारण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.शिवसेनेचा (उबाठा) महत्त्वाकांक्षी मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्प सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी लांबणीवर टाकला आणि खर्चात प्रचंड वाढ झाल्यानंतर काही भागांमध्ये काम सुरू केल्याचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. मात्र, याच परिसरात आणि बागांमध्ये अनेक होर्डिंग्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्याद्वारे सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या हमीपत्राचेही उघड उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. ‘सागरी किनारा मार्गालगतच्या टाटा उद्यान आणि हाजी अली उद्यानामध्ये भाजपच्या कंत्राटदार मित्रांच्या फायद्यासाठी अनेक होर्डिंग्ज मंजूर करण्यात आले आहेत. या दोन्ही जागा सीआरझेड अंतर्गंत आहेत. सागरी किनारा मार्गावर होर्डिंग्ज लावण्याची परवानगी मिळाल्यास ते धोकादायक ठरू शकते. या होर्डिंग्जच्या दरांमध्ये तफावत असल्याने या निविदेत आर्थिंक अनियमिमता असून, ही कंत्राटे तत्काळ रद्द करून चौकशीची मागणी ठाकरे यांनी आयुक्त गगराणी यांच्याकडे केली.

महापालिका आयुक्त गगराणी यांच्या भेटीनंतर आशीष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधताना, सागरी किनारा तयार करताना टाकण्यात आलेल्या भरावातून १८० एकर जागा निर्माण झाली असल्याचे सांगितले. ‘देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या सागरी किनारा मार्गाच्या परवानग्या देण्यात आल्या होत्या. त्यावेळी केंद्रीय पर्यावरण खात्यानेही या जागेचा वापर कोणत्याही व्यावसायिक कारणांसाठी करण्यात येणार नाही, याचे प्रतिज्ञापत्र मुंबई महापालिकेने द्यावे, अशी अट घातली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्यानंतर हे प्रतिज्ञापत्र केंद्रीय पर्यावरण विभागाला दिले गेले नाही. त्याबाबत ‘कॅग’नेही ताशेरे ओढले होते. केंद्रातील मंत्र्यांनी मागणी करूनही तसे प्रतिज्ञापत्र का दिले नाही’, असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला. यामध्ये कोणते अधिकारी होते, त्यांच्यावर दबाव होता का, याबाबतची चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी केली. या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव होता, असा आरोप करून शेलार यांनी याबाबत आदित्य यांनी उत्तर देण्याची गरज असल्याचेही सांगितले.
विधानसभेसाठी उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, ‘या’ दिवशी दिल्ली दौरा करणार, बड्या नेत्यांची घेणार भेट
‘व्यावसायिक बांधकामास परवानगी नाही’

सागरी किनारा मार्गाच्या जागेत कोणत्याही व्यावसायिक बांधकामास परवानगी नाही. त्यामुळे मार्गाच्या मोकळ्या जागेत होर्डिंग्ज लावण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे मुंबई महापालिकेने आदित्य ठाकरे यांना पत्राद्वारे कळवले आहे. महसूलात वाढ होण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर या मार्गालगतच असलेल्या भुलाभाई देसाई मार्ग येथील टाटा उद्यान या ठिकाणी डिजिटल होर्डिंग्जसाठी, लाला लजपतराय उद्यान, हाजी अली, महालक्ष्मी या ठिकाणीही होर्डिंग्जसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यासाठी वाहतूक शाखेचे ना हरकत प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए)यांचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक असून, त्यानंतरच पुढील प्रक्रिय राबवली जाणार असल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे.

Source link

aditya thackerayashish shelarbjp vs shivsenaBMCMumbai Coastal Roadmumbai illegal hoardingsमुंबई बातम्यामुंबई सागरी किनारा मार्गशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Comments (0)
Add Comment