मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विविध मुद्यांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, मुंबई पोलिस अधिकारी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यासाठी महापालिकेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
यंदा ऑनलाइन खरेदी माध्यमांशी संपर्क साधून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घरपोच वितरण करण्याची सुविधा पुरविण्याकरिता समन्वय साधण्यात येणार आहे. तसेच गुगल मॅपवर कृत्रिम तलावांची यादी देण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यासाठी मुंबईतील सर्व कृत्रिम तलावांची माहिती सहज उपलब्ध होईल. याद्वारे घराजवळ असलेल्या कृत्रिम तलावाचीही माहिती मिळेल. यंदा कृत्रिम तलावांची संख्या दोनशेपेक्षा अधिक वाढवण्याचे लक्ष्य निश्चित केल्याचे परिमंडळ २चे उपायुक्त आणि गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली.
एक खिडकी योजना सुरू
राज्य शासनाच्या निर्णयानुसार गेली दहा वर्षे नियमांचे पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेशेत्स मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवापासून सलग पाच वर्षांकरिता विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. याकरिता मागील दहा वर्षांत सर्व नियम, कायदे यांचे पालन केले आहे आणि आपल्याविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे स्वयंघोषणापत्र देणे सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी आवश्यक असणार आहे. या परवानगीचे दरवर्षी नूतनीकरण करणे गरजेचे असेल. ६ ऑगस्ट २०२४ पासून एक खिडकी योजनेनुसार संगणकीय प्रणालीद्वारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी ऑनलाइन परवानगी देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची महापालिकेकडून सांगण्यात आले.
क्यूआर कोडवरही मिळणार माहिती
क्यू आर कोडद्वारेही गणेशभक्तांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. हा क्यू आर कोड गणेश मूर्तिकारांच्या मंडपाबाहेर दर्शनीय भागात लावण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक होण्यासाठी मदत मिळणार आहे.
फिरत्या शौचालयांची संख्या वाढणार
विसर्जनाच्या दिवशी गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम चौपाटी येथे फिरत्या शौचालयांची संख्या वाढविण्यात यावी, अशी सूचना मंगळवारच्या बैठकीत घेण्यात आली. त्यानुसार विसर्जनाच्या दिवशी फिरत्या शौचालयांची संख्या वाढवण्याचे निर्देश पालकमंत्री लोढा यांनी दिले.