गोंडपिपरी तालुक्यात येणारं सोमनपल्ली हे लहानस गाव आहे. गावाची लोकसंख्या एक हजार तीनशे.कुटुंब संख्या जेमतेम ४५० इतकी आहे. गावाला लागून नाला वाहतोय याच नाल्याच्या काठावर अनेकांची शेती आहे. शेतात धान,कापूस,तुर पिके डोलात उभी आहेत. मात्र रानडुकरांकडून याच शेत पिकांचे मोठे नुकसान होवू लागले आहे. संतोष दुर्गे यांच्या अर्धा एकर शेतातील कापूस, तूर पिक रानडुकरांनी भुईसपाट केले. शेतात हैदोस घालणारी डुकरे आता थेट गावात पोहचली आहेत. गावातील रामदास मडावी यांच्या घरात रानडुकराने शिरकाव केला आणि त्यांचा कुटुंबावर हल्ला चढविला. त्यांची पत्नी सावित्रीबाई यांनी घरातील आढ्याचा आधार घेतला. मात्र डुकराच्या हल्ल्यात रामदास गंभीर जखमी झालेत.
गावातील अनेक शेतकऱ्यांचे धान ढोलीत अंगणात ठेवले आहेत. या धानावर रानडुकरे तुटून पडली आहेत. शेतपिकांचा सुरक्षेसाठी शेताभोवती लावल्या जाणारी झटका मशीन धानाचा ढोल्यांचा सुरक्षेसाठी वापरल्या जात आहे, एवढी दहशत हल्ले अथवा शेतपिकांचे नुकसान झाले तर गावकरी मध्य चांदा वन विभागाचे धाबा येथील कार्यालय गाठतात. वन कर्मचारी पंचनामे सुद्धा करतात. मात्र मदतीच्या नावावर शेतकऱ्यांचे हात रिकामेच असतात, असा गावकऱ्यांना आलेला अनुभव . दरवर्षी रानडुकरांमुळे शेतपिकांचे होणारे नुकसान बळीराजा सोसत आला आहे. आता मात्र त्यांच्या जीवावरच रानडुकरे उठली आहे. प्रश्न गंभीर आहे मात्र यातून गावकरी, शेतकऱ्यांचा सुटकेचा मार्ग वन विभागाला अद्याप गवसला नाही. ही मोठी शोकांतिका.