अंध तरुणाचं म्हणणं काय?
गेल्या चार वर्षांपासून मी रमाई योजनेअंतर्गत घराची मागणी करत आहे. मात्र ते अद्याप पर्यंत मिळाले नाही. माझ्या टपरीवर महापालिकेकडून अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या माणसांना जाब विचारला असता त्यांनी “शेखर साहेबांनी फक्त अपंगांना त्रास देण्यास सांगितल्याचा” दावा अंध तरुणाने केला आहे. या रागातून त्याने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. महानगर पालिकेत स्वातंत्र्य दिन साजरा केला जात असताना एका अंध व्यक्तीने ही गाडी फोडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
“पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सामान्यांसाठी लोकशाही संपलेली आहे. सध्या फक्त हुकूमशाही सुरु आहे. या अधिकाऱ्यांना लोकशाहीची जाणीव करून देण्यासाठी ही गोष्ट केल्याचे” या अंध व्यक्तीकडून सांगण्यात आले आहे. गाडी फोडल्यानंतर पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेऊन मारहाण देखील केली असल्याचे या अंध व्यक्तीकडून सांगण्यात आले आहे.
पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु
दिव्यांग व्यक्तींवर महापालिकेकडून अन्याय होत असल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीत समोर येत आहे. या घटनेवेळी संबंधित अंध व्यक्तीसोबत आणखी कोण होते, याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. या घटनेचा पुढील तपास करणे सुरु आहे. याबाबात आयुक्तांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.