आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून या योजनेवरुन बराच राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरु असतानाच गुरुवारी या योजनेतील पात्र महिलांना दोन हप्ते त्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी ही योजना राज्यात सर्वत्र पोहचविण्यासाठी महायुती सरकारने सर्वस्व पणाला लावले आहे. त्याअंतर्गत आता या योजनेच्या प्रसिद्धी करिता माध्यम आराखडा राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयानुसार आता राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे हा माध्यम आराखडा राबविण्यात येणार आहे. त्यानुसार १९९ कोटी ८१ लाख ४७ हजार ४३६ रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. याअंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जाहिरात प्रसिद्धीची कार्यवाही माध्यम आराखडा समितीतर्फे करण्यात येणार आहे. तर या योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी मीडिया प्लनिंग करणे, दृकश्राव्य, श्राव्य जाहिरातीचे क्रिएटिव्ह त्याचप्रमाणे बाह्य माध्यमांच्या प्रसिद्धीचा मजकूर अंतिम करण्याची कारवाई करण्याची सूचना यावेळी समितीतर्फे करण्यात आली आहे.
माहितीपट, जिंगल्स, थिम सॉंग तयार करणार
या निर्णयानुसार ही योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रिंट, टीव्ही या माध्यमाप्रमाणेच अॅनिमेशन फिल्म, थिम साँग, जिंगल्सची निर्मिती करण्यात येणार असून त्यानुसार माध्यम आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याशिवाय १६ एफएम वाहिन्यांवरही याची प्रसिद्धी केली जाणार आहे.
ट्रेन आणि सिनेमागृहातही होणार प्रसिद्धी
ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सिनेमागृहातही याची प्रसिद्धी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याशिवाय मुंबईतील सेंट्रल आणि हार्बर रेल्वेवर ऑडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाणार आहे. याशिवाय राज्यातील अनेक एसटी स्टॅण्ड, बस स्टॅण्ड, खासगी होर्डिंग्ज, मुंबई विमानतळ, मेट्रो रेल्वेमधून यासाठी प्रसिद्धी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.