जीवघेण्या ट्रिकवर संताप
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. साप म्हटलं की लहान असो वा मोठा, महिला असो वा पुरुष, प्रत्येकालाच भीती वाटते. अशा वेळी साप निघाला की सर्पमित्रांची आठवण होते. फोन केल्याबरोबर सर्पमित्रही आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन घटनास्थळी येतात. सापाला जेरबंद करुन वन विभागात नोंद करतात आणि जंगलातील अधिवासात सोडून देतात. परंतु वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात वेगळाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे विश्वास वाटणाऱ्या सर्पमित्रांविषयीही आता नागरिकांच्या मनात प्रश्न पडला आहे.
त्याचे असे झाले की वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरातील विठ्ठल वार्ड येथे व्यापारी संघाचे उपाध्यक्ष अनिल जेठानंद लालवानी राहतात. त्यांचा किराणा दुकानाचा व्यवसाय आहे. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरातील महिला फिरत असताना एका युवकाने अनिल लालवानी यांच्या घरात प्लास्टिक डब्यातून एक साप सोडल्याचे महिलांना दिसले. तसेच मोपेड दुचाकीस्वार एमएच ३२ ए.आर ८१८३ वर बसून असलेल्या युवकानेही साप सोडताना एका युवकाला पाहिले.
यानंतर महिलांनी आरडाओरडा केला असता अनिल लालवानी, शुभम लालवानी दोघेही बाहेर आले. लोकही जमा झाले त्यांनी या युवकाला पकडले असता, सर्पमित्र चेतन विलायतकर असल्याची त्याची ओळख पटली. भाविका मुरली लालवानी आणि भावना मनोज लालवानी यांनी चेतन विलायतकर याने घरात साप सोडल्याचे सांगितले. आधी त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु उपस्थित नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. परिसरातील नागरिकांनी सापाची पाहणी केली असता तो आढळून आला नाही.
चेतन विलायतकर (राहणार रामदेव बाबा वार्ड) याने पकडलेले साप जंगलात न सोडता स्वतःजवळ बाळगून जाणीवपूर्वक माझ्या घरातील लोकांच्या जीवितास इजा होईल अशा हेतूने साप घरात सोडला, याची पडताळणी करून तपासणी करावी, अशी तक्रार आर्वी पोलिसात मध्यरात्री एक वाजता देण्यात आली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता बीएनएस 2023- 291 नुसार गुन्हा दाखल केला आहे.