कारल्याची यशस्वी शेती
चंद्रपूर जिल्हातील मागासलेला तालुका अशी ओळख असलेला गोंडपिपरी उद्योग नसलेला तालुका. केवळ शेती येथील मुख्य व्यवसाय. तालुक्याला वर्धा, वैनगंगा, अंधारी नद्यांनी वेढा दिला, खरा मात्र एकही मोठा सिंचन प्रकल्प येथे नाही. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका येथील शेतीला बसत असतो. पिकली तर शेती, नाहीतर माती अशी येथील अवस्था. या साऱ्या संकटावर मात करत काही शेतकऱ्यांनी शेतीत उंच भरारी घेतली आहे.
पिता-पुत्राचा शेतात नवा प्रयोग
वेजगाव येथील शेतकरी पिता, पुत्राची चर्चा सध्या होत आहे. बाबुराव आस्वले हे ६५ वर्षाचे, पण त्यांची शेतीची ओढ सुटलेली नाही. मोठा मुलगा दीपक यांच्या सोबतीने ते शेतात नवीन प्रयोग करत असतात. दोन एकर जागेत ते मिर्ची, भाजीपाल्याचं पिक घेतात. यावर्षी त्यांनी दीड एकर जागेत कारलं पिकाचं उत्पादन घेतलं.
गावातील परशुराम लेडांगे यांनी कारलं पिकाचा प्रयोग केला होता. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश आलं. दीपक आस्वले यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि कारल्याची लागवड केली. कारलं पिकासाठी पन्नास हजार रुपये खर्च आल्याचं त्यांनी सांगितलं. पिक चांगलं जमून आलं. आतापर्यंत त्यांनी एक लाखाचं कारलं चंद्रपूरचा बाजारात विकलं आहेत. पुन्हा एक ते दीड लाखाचं उत्पादन होणार, अशी त्यांना आशा आहे.
शेतीत वडील, पत्नी, भाऊ सर्वांचीच मदत
दीपक यांनी शेतात बोअरवेल मारली आहे. यातून ते शेत पिकांना सिंचन करतात. टोमॅटो, ढेमसे, काकळी, मिरची आणि पालेभाज्यांची ते लागवड करतात. शेतकामात त्यांना वडील, पत्नी, लहान भावाची मदत होत असते. कृषी क्षेत्रातील कुठलीही पदवी नसताना केवळ अनुभवाच्या जोरावर पिता, पुत्र शेती फुलवत आहेत. दिवसभर शेतात घाम करणाऱ्या आस्वले कुटुंबांनी शेतीतूनच आर्थिक प्रगती साधली आहे.