अजित पवार येथे आले ही आपल्या सौभाग्याची गोष्ट आहे. आज वांद्रे पूर्व येथे अजित दादा त्यांच्या लाडक्या बहिणींना भेटणार आहेत. यावेळी कोणत्याही प्रकारचा पक्षप्रवेश होणार नाही. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे एक स्थानिक आमदार या नात्याने मी त्यांचे स्वागत केले, मी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची, याचा फैसला जनता घेईल, असेही झिशान सिद्दीकी म्हणाले. तर बाबा सिद्दीकी यांनीही आधी लेकाच्या पक्षप्रवेशाचं वृत्त फेटाळलं होतं. परंतु अजित पवारांच्या रॅलीत झिशानचा सहभाग काँग्रेसला मान्य होणार का, हा सवाल आता विचारला जात आहे.
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले होते. गुप्त मतदानामुळे त्या आमदारांची नावं समोर आली नव्हती, परंतु काँग्रेसने सात जणांना ओळखल्याचं बोललं जातं. यात झिशान सिद्दीकींच्या नावाचाही समावेश होता.
झिशान सिद्दीकी यांचे पिता आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. सिद्दीकी ४० वर्षांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये होते. त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुका लक्षात घेता बाबा सिद्दीकी यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत ताकद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तेव्हापासूनच झिशान सिद्दीकीही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र सहा महिने उलटल्यानंतरही ते काँग्रेससोबत आहेत.