बदलापूर शहरातील नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकलींवर शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे याने अत्याचार केल्याची घटना शनिवारी समोर आली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात तसेच इतर तपासाच्या आणि वैद्यकीय बाबींमध्ये आणि आरोपीला पकडण्यात बदलापूर पूर्व पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे आणि पोलिस प्रशासनाने उदासीन भूमिका घेत विलंब केल्याचा आरोप काही सामाजिक आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. मंगळवारी सकाळी बदलापूर स्टेशनवर हजारो महिलांनी एकत्र येऊन घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी महिलांनी लोकल ट्रेन रोखून धरल्या तसेच रिक्षा चालकांनीही रिक्षा बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.
तुमच्या भावना आम्ही समजू शकतो पण प्लीज ट्रॅकवरून बाजूला व्हा, पोलिसांची विनंती आंदोलकांनी धुडकावली
दरम्यान मंगळवारी सकाळपासून रेल्वे ट्रॅकवर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे आले. त्यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेऊन सरकारपर्यंत तुमच्या भावना पोहोचवतो, असे सांगितले. आंदोलकांना हात जोडून विनंती करताना अनेक विद्यार्थी, आजारी रुग्णांची गैरसोय होत असल्याचे सांगत आपण ट्रॅकवरून बाजूला व्हावे, अशी विनंती शिसवे यांनी आंदोलकांना केली. मात्र आंदोलक ऐकायला तयार नव्हते. आरोपीला फाशी द्या, अशा जोरदार घोषणा आंदोलकांकडून सुरू होत्या.
अन् चिडलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडांचा वर्षाव सुरू केला
आंदोलक ऐकत नसल्याचो पाहून पोलिसांनी काहीसा आक्रमक पवित्रा घेतला. त्याचवेळी चिडडेल्या आंदोलकांनी पोलिसांवर जोरात दगडफेक करायला सुरुवात केली. या दगडफेकीत एक महिला आणि एक पोलीस जखमी झाले आहेत.