मागील तीन तासांपासून उपनगरीय वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना याचा त्रास होत आहे. सकाळी साडेनऊ वाजेपासून बदलापूर ते कर्जत दरम्यान लोकल सेवा ठप्प झाली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावर देखील पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. शाळा प्रशासनात्या विरोधात पालक तसेच आंदोलक आक्रमक झाले आहेत.
देवेंद्र फडणवीसांकडून SIT गठित करण्याचे आदेश
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत.
सर्व शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन
बदलापूरच्या कुळगाव येथील शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात बदलापूरात उद्रेक उसळल्यावर सरकारला जाग आली आहे. आता कॅार्पोरेट कार्यालयांच्या धर्तीवर सर्व शाळांमध्येही विशाखा समिती स्थापन होणार आहे. यात नववी-दहावीच्या विद्यार्थिनी प्रतिनिधी असतील, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. तसेच या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात दिरंगाई करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना निलंबित करावे, अशी मागणीही आपण गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील शाळेत सीसीटीव्ही चालू अवस्थेत नसल्याचे आढळले आहे. त्यावरही कारवाई होईल, असेही केसरकर म्हणाले.