संध्याकाळी गर्दीच्या वेळी कल्याण ते अंबरनाथवरून प्रवाशांसाठी राज्य परिवहन आणि केडीएमसीकडे एकूण १०० बस गाड्यांची मागणी केली आहे. मेल-एक्स्प्रेस सरासरी एक तास उशीराने धावत होत्या.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन अंबरनाथ-कसारापर्यंत रेल्वे वाहतूक सुरू होती. मात्र अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान आंदोलकांमुळे रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती. रेल्वे स्थानकात झालेल्या आंदोलनामुळे दुपारी ४ वाजेपर्यंत १२ मेल-एक्स्प्रेस आणि ३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. १३ मेल-एक्स्प्रेस बदलापूर-कल्याण ऐवजी दिवा-पनवेल-कर्जतमार्गे चालवण्यात आल्या होत्या, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळी आंदोलकांनी रुळावर येत घोषणा देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांना वारंवार रुळांवरून हटवण्याचं आवाहन केलं. मात्र आंदोलक ठाम असल्याने त्यांनी रेलरोको करत ट्रॅकवर आंदोलन सुरूच ठेवलं. अखेर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना रुळांवरून दूर केलं. बदलापूर स्थानकात झालेल्या दगडफेकीत ४ रेल्वे पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, नामांकित शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने मुलींवर अत्याचार केल्यानंतर काही दिवस उलटून गेले, तरी याप्रकरणी कोणतीही दखल घेतली जात नव्हती. अखेर संतप्त नागरिक, पालकांनी शाळेसमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशा घोषणा देत, रेलरोको करत सरकारला या प्रकरणाची दखल घेण्यास भाग पाडलं.