मात्र आता यावरूनच वडगावशेरी मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीत नवा वाद उभा राहिला आहे. या मतदारसंघात नक्की उमेदवार कोण? यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये नवा संघर्ष उभा राहण्याचे चित्र आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे विरुद्ध भाजपचे जगदीश मुळीक यांच्यात लढत झाली होती. त्यात जगदीश मुळीक यांचा पराभव झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपची महायुती झाल्याने मुळीक की टिंगरे नक्की उमेदवारी कोणाला द्यायची यावरून वाद सुरु असताना आता भाजपमधील आणखी दोन बडे नेते या शर्यतीत उतरल्याने अजित पवारांसमोर भाजपचे तिहेरी आव्हान उभा राहिले आहे.
भाजपकडून आता वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे आणि माजी आमदार बापूसाहेब पठारे हे देखील इच्छुक आहेत. या तिघांचीही मतदारसंघात जोरदार तयारी सुरु आहे. जगदीश मुळीक हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी देखील इच्छुक होते मात्र त्यावेळी त्यांना संधी मिळाली नाही म्हणून आता त्यांनी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघावर ठोस दावा ठोकला आहे.
तर दुसरीकडे, मी भाजपकडून वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ लढवण्यासाठी इच्छुक आहे. महायुतीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात कुठलीही बैठक झाली नाही. त्यामुळे कोणती जागा कुणाला सुटलेली आहे किंवा कोणत्या जागेवर कोणी दावा केला याला अर्थ नाही. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपची ताकद आहे आणि मी भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक आहे. पक्षाने संधी दिल्यास मी या ठिकाणी निवडणूक लढवणार आणि विजयी देखील येणार असल्याचं अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांनी महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनशी बोलताना म्हटलंय. दातम्यान, बॉबी टिंगरे यांच्या संपर्कात राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) पक्ष असल्याची देखील माहिती आहे.
बॉबी टिंगरे यांच्या सोबतच यापूर्वी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आणि जुने राष्ट्रवादीचे आणि आता भाजपात असलेले बापू पठारे यांनी देखील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा शड्डू ठोकला आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मी निश्चय केला आहे. भारतीय जनता पक्षाने मला तिकीट दिलं तर चांगलं आहे अन्यथा माझ्यासाठी इतर पर्याय देखील खुले आहेत त्यात मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत या चर्चा मी नाकारत देखील नाही. भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी माजी आमदार आणि एका माजी नगरसेवकांनी देखील फिल्डिंग लावली आहे मात्र मी देखील उमेदवारी मिळावी यासाठी माझ्या स्तरावर ताकद लावली आहे. असं बापू पठारे यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीला भाजपच्या तिहेरी आव्हानाला समोरे जावे लागणार की भाजपच्या दोन बड्या माशाला शरद पवार गळाला लागणार हे लवकरच समजेल.