ज्याप्रमाणे दोन नेते एकमेकांवर आरोप करत आहेत त्यावरून युतीच्या दोन पक्षात आणि सरकारमध्ये एकवाक्यता नाही, हेच पुन्हा एकदा दिसून येत आहे. सरकारमध्ये एक वाक्यता नसल्यामुळे कोकणचा विकास त्यांच्याकडून होऊ शकत नाही. निवडणुकीत कोकणामध्ये पैसे वाटप करून आणि लोकांची दिशाभूल केल्याने युतीला विजय मिळाला आहे. आता मात्र कोकणची जनता सुज्ञ झाली आहे, जनता याचा नक्कीच अभ्यास करेल. विधानसभा निवडणुकीत कोकणातील जनता पुन्हा एकदा शिवसेनेच्या पाठीशी राहील असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम वाद काय?
चमकोगिरी करणारे कुचकामी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असा ‘घरचा आहेर’ महायुतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिला होता. मुंबई गोवा हायवेचं बांधकाम रखडल्याबद्दल संताप व्यक्त करताना कदमांनी चव्हाणांवर निशाणा साधला होता. यावर प्रतिक्रिया देताना चव्हाणांनी त्यांना अडाणी संबोधलं आहे. तोंड सांभाळून बोलायचं नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच चव्हाणांनी दिला.
अशातच आता कोकणात गेले १७ वर्षे चाललेला मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वास जात नाही, तोपर्यंत नवीन महामार्गाचे काम सुरू होऊ देणार नाही ग्रीन फील्ड हायवे उभारण्याच्या प्रक्रियेलाही आमचा विरोध राहील, अशी भूमिका जनआक्रोश समिती आणि समृद्ध कोकण संघटनेचे संजय यादवराव यांनी घेतली आहे. यामुळे बहुचर्चित ग्रीन फील्ड हायवे सुद्धा वादाच्या भोवऱ्यात आला आहे.