उद्धव ठाकरे यांनी केली होती घोषणा
16 ऑगस्ट रोजी षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचे आवाहन केलं होतं. परंतु दोन्ही पक्षांनी त्याला उत्तर दिलं नाही. यावरून ठाकरे गट नाराज झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, शिवसेना ठाकरे गटाने मागणी केली आहे.
लोकसभेची लढाई हे देशाचे संविधान वाचवण्यासाठी होते. आता विधानसभेची महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र संस्कृती वाचवायची आहे. महाविकास आघाडीच्या दूतांनी गावागावात जावून आपल्या कामांचा प्रचार करावा. असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून पसंती
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील याबाबतचे संकेत दिले होते. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केल्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं ठरू शकतं. असे संजय राऊत म्हणाले होते. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांचे काम जनतेने पाहिले आहे. असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून महाविकास आघाडीला मतं मिळाली आहेत. त्यामुळे राज्यात जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे.