CM Ladki Bahin Yojana: नोटबंदी काळाची पुनरावृत्ती, सरकारच्या ‘लाडकी’ची कसरत; बँकांकडून कामांत दिरंगाई

म. टा. वृत्तसेवा, घोटी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर बँकांमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. केवायसीसह अन्य कामांमध्ये बँकांकडूनही दिरंगाई होत असल्याने रांगा वाढत आहेत. घोटीत महिनाभरापासून महिला पहाटेपासूनच रांगेत उभ्या राहत असल्याचे चित्र दिसून आले. तर ग्रामीण भागातील काही महिला काम अपूर्ण राहिल्याने घरी परतण्याऐवजी रात्रीच्या सुमारास बँकेसमोरच मुक्कामी थांबत असल्याचे चित्र दिसत आहे.

नोटबंदीच्या काळात झाला नाही एवढा त्रास महिलांना या योजनेच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी करावा लागत आहे. बँकिंग कामासाठी स्टेट बँकेकडून होणारी गैरसोय, कामकाजात विलंब व अडवणूक याबाबत बँक प्रशासन दखल घेणार की अशाच नियोजनाला महिलांना सामोरे जावे लागणार, असा प्रश्न भेडसावत आहे. गैरसोयीमुळे महिलांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील अनेक महिला खातेदारांनी घोटीतील स्टेट बँकेसह बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, पोस्ट आदी ठिकाणी बचत खाते उघडले आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी अर्ज दाखल केले परंतु, खात्यात योजनेचा लाभ येण्यासाठी अनेकांच्या बँक खात्यात त्रुटी असल्याने त्याची पूर्तता करण्यासाठी महिनाभरापासून बँकांच्या आवारात महिलांची गर्दी होत आहे. सर्वच बँकांत गर्दीची स्थिती सारखीच आहे. महिलांच्या खात्यातीत बँकिंगची कामे जलद गतीने होत नाहीत, निरक्षर महिलांना समजावून सांगितले जात नाही, बँकेच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत, अशा अनेक कारणांमुळे महिला हतबल झाल्या आहेत. दिवसभर बँकेत उभे राहूनही काम न झाल्याने महिलांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे.

ग्रामीण भागातील महिला मुक्कामी

दिवसभर बँकेच्या रांगेत प्रतीक्षेत राहूनही केवायसी, खात्याला मोबाइल नंबर लिंक करणे, पैसे काढणे, आधार लिंक करणे, नवीन खाते उघडणे आदी कामे न झाल्यास ग्रामीण भागातील अनेक महिला दुसऱ्या दिवशी पुन्हा कागदपत्राच्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी यावे लागू नये म्हणून घोटीतील स्टेट बँकेच्या आवारातच मुक्कामी थांबत आहेत. दुसऱ्या दिवशी तरी बँकेचे काम मार्गी लागेल ही अपेक्षेपोटी त्यांचा रोजगारही बुडत आहे. दरम्यान बँक प्रशासनाने विशेषतः स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालून, नियोजन करून महिलांची बँकिंगची कामे जलदगतीने पूर्ण करून महिलांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी अथवा पालकमंत्री यांनी अचानक भेट देऊन पाहणी करून बँकांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही होत आहे.

Source link

cm ladki bahin yojanaKYC row in bankladki bahin applicantstate bankwomen Applicants for ladki bahinबँकांकडून लोकांची गैरसोयमहाराष्ट्र सरकारमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनायोजनांसाठी महिला अर्जदारलाडक्या बहिणीला मनस्ताप
Comments (0)
Add Comment