Violence Against Women: गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आज इंदापुरात दाखल झाली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर हे उपस्थित होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, कोल्हापूर मध्ये सख्या मामानेच हे कृत्य केले. बदलापूर, अंबरनाथ तसेच दौंड तालुक्यातील मळद येथे ही अशा घटना घडल्या आहेत. परंतु २४ तासात या घटनांवर निकाल झाला पाहिजे. अशा स्वरूपाची व्यवस्था आता कार्यान्वित करण्याची गरज असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचे xxx… असा गंभीर इशारा पवारांनी ( शब्दप्रयोग न करता हातवारे करून) दिला.
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून महिला अत्याचारांच्या घटनात वाढ होत आहे. अगदी अल्पवयीन मुलींचा अत्याचाराला बळी जात आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा नराधमांन बाबत गंभीर इशारा दिला असून २४ तासाच्या आत निकाल लागेल अशी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी बंदची हाक दिली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना बंद पुकारता येणार नाही असे सांगत हा बंद बेकायदेशीर असल्याचे सांगितले. तसेच बंद केला तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सरकारला तसेच पोलीस प्रशासनाला दिले. महाराष्ट्र बंद पुकारल्यास राज्याच्या अर्थकारणावर परिणाम होऊन मोठे नुकसान होईल. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य सेवा आणि अत्यावश्यक सेवा यासह अनेक बाबींवर विपरित परिणाम होईल, त्यामुळे महाविकास आघाडीला बंद पाळण्यास मनाई करावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती. या निर्णयानंतर शरद पवारांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करून बंद मागे घेण्याचे आवाहन केले. तर काँग्रेसने नेते नाना पटोले यांनी देखील महाविकास आघाडीकडून बंद मागे घेत असल्याचे सांगितले.