संघाचा प्लॅन काय?
महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती आणि भाजपसमोर उभी असलेली आव्हानं लक्षात घेता, आगामी विधानसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांनी अधिक भूमिका बजावावी, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही नेत्यांनी व्यक्त केलं आहे. विधानसभेच्या फक्त प्रचारासाठीच नव्हे, तर नियोजनातही लक्ष घालण्याचं सुचवण्यात आलं आहे. ‘एबीपी माझा’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
आश्वासक चेहऱ्यामुळे गडकरींवर मदार
नितीन गडकरी यांचा विकासात्मक आणि मवाळ चेहरा भाजपला उपयुक्त ठरण्याचा अंदाज आहे. गेली काही वर्ष केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामांमुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपसाठी आगामी निवडणुकांत ते उपयुक्त ठरतील, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मत आहे. त्यामुळे निवडणूक नियोजनात गडकरींना अधिक सक्रिय राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र भाजपकडून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
उमेदवारांच्या निवडीतही सहभाग?
लोकसभा निवडणुकीत राज्यातील परिस्थितीचा विचार करता, अनुभवी नेत्यांना परत आणण्याची गरज आहे का, याची चाचपणी भाजप आणि संघाचे नेते करत आहेत. नितीन गडकरींचा चेहरा राजकारणात अधिक सक्रिय करण्याबाबत विचार विनिमय सुरु आहे. महाराष्ट्रातील दैनंदिन राजकारणापासून नितीन गडकरी काहीसे लांब आहेत. त्यामुळे विधानसभेला त्यांचा सहभाग कशा प्रकारचा असेल, उमेदवारांची निवड आणि प्रचारात ते दिसणार का, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.