भाजपच्या जागेवर राष्ट्रवादीचा डोळा
जिल्ह्यातील नवापूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा उमेदवार मागील पंचवार्षिकमध्ये निवडून आला होता. गेल्या १० वर्षापासून ही जागा भाजपला सुटत आहे. मात्र त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार विजयी झाला नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने नवापूर विधानसभा क्षेत्राची जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी मागणी केली आहे. त्यासोबत शिंदे सेनेनेही नवापूरच्या जागेवर धावा ठोकला आहे.
शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच
राज्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ असलेला अक्कलकुवा-अक्रानी मतदारसंघ आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार गेल्या सहा टर्मपासून निवडून येत आहेत. या मतदारसंघात २०१९ मध्ये शिवसेनेतर्फे आ.आमश्या पाडवी यांनी उमेदवारी केली होती. त्यांचा थोड्या फरकाने पराभव झाला होता. या विधानसभा मतदारसंघासाठी शिंदे शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे. मात्र, या मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे. या मतदारसंघातील काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते तसेच माजी सभापती रतन पाडवी यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेही विधानसभा लढण्याच्या तयारीत आहेत. त्यातच या विधानसभा क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत धुळे येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे अक्कलकुवा-अक्रानी मतदारसंघासाठी शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. महायुतीतील अनेक जागांवर दावे प्रतिदावे देखील करण्यात येत आहेत.