Lalbaug Bus Accident: मुंबईच्या लालबागमध्ये बेस्टची बस गर्दीत शिरल्यानं आठ जण जखमी झाले. यापैकी एका जखमी तरुणीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
गणेशोत्सवाआधीचा रविवार असल्यानं नागरिकांनी लालबागमध्ये काल खरेदीसाठी गर्दी केली. रात्री साडे आठच्या सुमारास बेस्टची ६६ क्रमांकाची बस लालबागच्या गरम खाडा मैदानासमोरुन जात होती. त्यावेळी बसमधील एका दारुड्या प्रवाशानं क्षुल्लक कारणावरुन चालकासोबत हुज्जत घातली. दारुड्यानं जबरदस्तीनं बसचं स्टेअरिंग फिरवल्यानं अपघात झाला. त्यात आठ जण जखमी झाले. त्यातील एका जखमी तरुणीचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.
२७ वर्षांची नुपूर मणियार गणेशोत्सवादरम्यान स्वयंसेवक म्हणून काम करायची. यंदाच्या गणेशोत्सवातही बाप्पाची सेवा करण्याचा तिचा मानस होता. त्यासाठी ती स्वयंसेवकाचा बॅच घेण्यासाठी रविवारी रात्री गेली होती. बॅच घेऊन परतत असताना तिला बसनं मागून धडक दिली. तिच्या छातीला, ओटीपोटाला गंभीर दुखापत झाली. तिच्यावर केईएमच्या आयसीयू वॉर्डमध्ये उपचार सुरु होते. पण उपचारांदरम्यान तिची मृत्यूशी झुंज संपुष्टात आली.
नुपूर मणियार प्राप्तिकर विभागात क्लर्क पदावर कार्यरत होती. बाप्पाच्या सेवेसाठी ती गणेशोत्सवात स्वयंसेवक म्हणून काम करायची. यंदाही तिला गणपती बाप्पाची सेवा करायची होती. पण त्याआधीच काळानं तिच्यावर घाला घातला. त्यामुळे मणियार कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे. नुपूर आई आणि लहाण बहिणीसोबत राहत होती. नुपूरच्या अकाली निधनानं दोघींना धक्का बसला आहे.
बेस्ट बसमधील दारुड्या प्रवाशानं चालकासोबत घातलेला वाद आणि त्यानंतर जबरदस्तीनं फिरवलेलं स्टेअरिंग नुपूरसाठी जीवघेणं ठरलं. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना धडकली. बस अचानक वेडीवाकडी चालू लागल्यानं या ठिकाणी असलेल्या नागरिकांची पळापळ सुरु झाली. यात आठ जण जखमी झाले. चालकानं वेळीच नियंत्रण मिळवल्यानं पुढील अनर्थ टळला.