Nitesh Rane: अहमदनगर रविवारी सकल हिंदू समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ तसेच बांग्लादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रविवारी नगरमध्ये सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला होता. यासाठी राणे नगरला आले होते. मोर्चाचा समारोप दिल्ली गेट येथे झाले. त्यावेळी राणे यांचे आक्रमक भाषण झाले. आपण हिंदूंचे गब्बर असल्याचेही ते म्हणाले. राणे यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखवणारे भाषण केल्याची फिर्याद शेख यांनी दिली. त्यानुसार राणे आणि मोर्चाचे संयोजक दिगंबर गेंट्याल यांच्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सिन्नर येथील प्रवचनात नगर जिल्ह्यातील सराला बेट येथील महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले. त्यावरून मुस्लिम समाजाने त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी मोर्चे काढले. त्यानंतर आता हिंदूंतर्फे ठिकठिकाणी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात येत आहेत. असाच मोर्चा रविवारी नगरला निघाला होता. समारोपप्रसंगी आमदार राणे यांनी केलेल्या भाषणावर मुस्लिम समाजाचा आक्षेप आहे. राणे यांचे भाषण मुस्लिम समाजाला धमकावणारे, धार्मिक भावना दुखवणारे आणि तेढ निर्माण करणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी नितेश राणेंविरूद्ध गुन्हा दाखल; म्हणाले होते, कोणी मस्ती केली तर किड्या-मकोड्यासारखे मारू
काय म्हणाले होते राणे
मंहत रामगिरी महाराज यांना पाठिंबा दर्शविताना राणे म्हणाले होते की,एवढ्या संख्येने बाहेर येऊ की किड्या-मकोड्यासारखे मारू. हा देश हिंदुंचा आहे आणि येथे फक्त भगवंतांचे चालेल बाकी कोणाचे नाही. कोणी मस्ती केली तर चून-चून के मारेंगे.