Thane Youth Train Death: भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यातील पाच्छापूर येथील मृतक अनिकेत जाधव आणि शहापूर तालुक्यातील अल्पवयीन मुलगी या दोघांमध्ये प्रेम होतं.
हायलाइट्स:
- पोलिसांच्या ताब्यात असताना प्रियकराचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू
- मृत्यू प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह दोन अंमलदार निंलबीत
- ठाणे शहापूर येथील धक्कादायक घटना
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यातील पाच्छापूर येथील मृतक अनिकेत जाधव आणि शहापूर तालुक्यातील अल्पवयीन मुलगी या दोघांमध्ये प्रेम होतं. प्रेमातून त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला असता २५ जुलै रोजी दोघेही लग्न करण्याच्या उद्देशाने पळून गेले. मात्र, त्यावेळी मुलीचे अपहरण मृतक अनिकेत याने केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकाने वाशिंद पोलीस ठाण्यात दिली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने दोघांचा शोध सुरू केला असतानाच, ते महिनाभरापासून मध्यप्रदेश राज्यातील एका शहरात असल्याची माहिती वाशिंद पोलिसांना मिळाली. वाशिंद पोलिसांनी मध्यप्रदेशातील पोलिसांच्या मदतीने वाशिंद पोलीस आणि मुलीच्या नातेवाईकांनी मध्यप्रदेश येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या ठिकाणाहून अनिकेत आणि त्याच्यासोबत असलेल्या त्याची प्रेयसी या दोघांना २५ ऑगस्ट रोजी मध्यप्रदेश येथून ताब्यात घेऊन रेल्वेने महाराष्ट्र राज्यात आणण्यात येत होतं. राजधानी एक्सप्रेस ग्वालियर रेल्वे स्टेशननजीक असलेल्या मुराई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रेन येताच अनिकेत याने बोगीच्या टॉयलेटच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याचं पोलिसांनी त्यावेळी सांगितले. त्यामुळं त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद मुराई रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
दरम्यान, अनिकेतचा मृत्यू हा पोलिसांच्या ताब्यात असताना झाल्याने अनिकेतच्या नातेवाईकांनी अनिकेतचा मृत्यू नव्हे तर त्याचा घातपात मुलीच्या घरच्यांनी केल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे पोलिसांच्या ताब्यात असतानाही अनिकेतचा रेल्वे अपघातात मृत्यू होणे एक संशयास्पद असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अनिकेतच्या कुटुंबियांनी केली. याबाबत सखोल चौकशी न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपाइंचे किरण चन्ने यांनी दिला होता.
या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन ठाणे ग्रामीण एसपी डॉ. स्वामी यांनी मृत अनिकेतला मध्यप्रदेश मधून ताब्यात घेणारे वाशिंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वांगड, पोलीस अंमलदार जोगदंड आणि चलवादी या तिघांना ३१ ऑगस्ट रोजी निलंबित करून त्यांची चौकशी सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बर्वे यांनी दिली आहे.