Mumbai News: माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला, कृत्रिम तलावांमधील मूर्तींचे विसर्जन दुसऱ्या दिवशी समुद्रात किंवा खाडीत करण्यात येते, असे उत्तर मिरा-भाईंदर महापालिकेने दिले आहे.
हायलाइट्स:
- मुंबई महापालिकेकडून सुस्पष्ट माहिती मिळणे आवश्यक
- आधीच पीओपीच्या मूर्तींबाबत निर्देशांनंतरही अंमलबजावणी नाही
- त्यात कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित मूर्तींबाबत संभ्रम
महामुंबई परिसरातील दोन महापालिकांकडून माहिती अधिकारात मिळालेल्या या उत्तरानंतर, मुंबईतील कृत्रिम तलावांसंदर्भातील प्रश्नाचे उत्तर मिळणेही आवश्यक असल्याचे जोशी म्हणाले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसंदर्भात निर्देश मिळूनही याची अंमलबजावणी होत नसेल, तर समुद्रामध्ये या काळात होणारे प्रदूषण, त्याचा सागरी जैवविविधतेवर होणारा परिणाम हा प्रश्न मोठा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित होणाऱ्या शाडूच्या मातीच्या मूर्तींची विल्हेवाट लावण्यासाठी काही सामाजिक संस्था पुढे आल्याची माहिती मुंबई महापालिकेचे गणेशोत्सव समन्वयक उपायुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली. मात्र, या संस्थांनाही केवळ शाडूची माती हवी असते. त्यामध्ये इतर घटक मिसळलेले चालत नाही. गणेशभक्तांनी शाडूच्या मूर्तींचा वापर वाढवावा, यासाठी मुंबई महापालिकेकडून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचेही ते म्हणाले.
मुंबई महापालिकेकडून स्पष्ट उत्तर नाही
मुंबईत कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन होणाऱ्या मूर्तींची संख्या दरवर्षी वाढत असताना, या मूर्तींचे पुढे काय होते या प्रश्नाचे सुस्पष्ट उत्तर मिळू शकलेले नाही. महामुंबई परिसरातील इतर दोन महापालिकांप्रमाणेच मुंबई महानगरपालिकाही कृत्रिम तलावांमधील मूर्ती नंतर समुद्रात विसर्जित करते का, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेकडून यासंदर्भात माहिती दिली जात नसल्याने या शंकेला बळकटी मिळत असल्याचे मत व्यक्त होत आहे.