Pune Parvati Assembly Constituency: ‘जनतेच्या मनातील आमदार, आपल्या आबांचे काम दमदार…, आबा बागुल यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा’ अशा आशयाचे फ्लेक्स संपूर्ण पर्वती विधानसभा मतदारसंघात लागले आहेत.
हायलाइट्स:
- राष्ट्रवादीच्या मतदारसंघात काँग्रेस नेत्याला विधानसभेसाठी शुभेच्छाचे बॅनर
- पर्वती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये नवा पेच
- काँग्रेस नक्की काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष
२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसच्या अश्विनी कदम यांनी लढवली होती. त्यावेळेस देखील राष्ट्रवादीने ही जागा आपल्याला सोडावी, अशी मागणी काँग्रेसने आबा बागुल यांच्यासाठी केली होती. मात्र त्यावेळेस ही जागा राष्ट्रवादीने सोडण्यास नकार दिला होता. पण आता आबा बागुल यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचाच निर्धार केल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये आबा बागुल यांना पुणे लोकसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी हवी होती. पण पक्षाने रवींद्र धंगेकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर आबा बागुल हे पक्षावर नाराज झाले होते. त्यांनी काँग्रेस भवन या ठिकाणी या निषेधार्थ आंदोलन देखील केलं होतं. आबा बागूल यांची नाराजी दूर करण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. माजी राज्यमंत्री रमेश बागवे, तसेच माजी आमदार उल्हास पवार हेही त्यांच्या समवेत होते. ‘पक्ष सोडून जाऊ नका, प्रचारात सक्रिय व्हा, तुमच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ’ असे थोरात यांनी बागूल यांना सांगितले होते. बाळासाहेब थोरात यांच्या या शब्दावर आबा बागुल यांनी काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय होऊन रवींद्र धंगेकर यांचा प्रचार केला. मात्र आता आबा बागुल निवडणूक लढवण्याच्याच मानसिकतेत असल्याने काँग्रेस नक्की काय निर्णय घेणार याकडे आबा बागुल यांच्यासह शहराचं लक्ष लागलं आहे.