Pune News: पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळ येथे मंदिरा शेजारी उभे राहून सेल्फी काढत पाय घसरल्याने १७ वर्षीय तरुणी आणि २२ वर्षीय तरुण दोघे वाहून गेले. या दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
श्रेया सुरेश गावडे (वय 17), रोहन ज्ञानेशवर ढोंबरे (वय 22) रा. चिंचवड गाव, अशी वाहून गेलेल्या तरुण-तरुणीची नावे आहेत. त्यांचा शोध प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपरी चिंचवड परिसरातून आज सकाळी पावणेदहाच्या समोरास मावळ तालुक्यातील कुंदमाळ येथे सहा मुले व दोन मुली फिरण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी श्रेया गावडे व रोहन ठोंबरे हे दोघेजण कुंडमाळच्या शेजारी असलेल्या मंदिरा शेजारी उभे राहून सेल्फी काढत होते. मात्र सेल्फी काढताना त्यांचा पाय घसरला व दोघेही पाण्यामध्ये वाहून गेले. त्यांच्या मित्र-मैत्रिणींना आरडाओरडा केल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सकाळपासूनच या दोघांना शोधण्याचे काम पिंपरी चिंचवड पोलीस व रेस्क्यू टीमकडून सुरू करण्यात आले आहे. ते वाहून गेल्याची घटना प्रत्यक्ष दर्शनी पोलिसांना दिली आहे. घटनास्थळी वन्यजीव आपदा संस्था मावळ तसेच तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून या दोघांना शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे सोबत आलेले मित्र-मैत्रिणी पूर्णतः घाबरलेल्या आहेत. घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या अगोदर देखील कुंडमाळ धबधब्यामध्ये अनेक जण वाहून गेले आहेत. त्यात त्यांचा मृत्यू देखील झाला आहे. मात्र आजची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या भागात शोधकार्य झपाट्याने सुरू असून पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.