chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : आरोपी जयदीप आपटे व तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना आज सिंधुदुर्ग न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी केली असून दोन्ही आरोपींना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जयदीपला कल्याणमधून अटक
जयदीप विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लूक आउट नोटीसही जारी केली होती. अशातच बुधवारी रात्री मुख्य आरोपी जयदीप आपटे याला कल्याण येथून त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. आज सकाळी त्याला मालवण पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. त्यांनंतर दुपारी या दोन्ही संशयित आरोपींना सिंधुदुर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्ष व संशयित आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी या दोन्ही संशयित आरोपींना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुतळा दुर्घटनेवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते सांगलीतील भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ”काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले आणि माफी मागून गेले. आपल्या हातून चूक होते, तेव्हाच माफी मागितली जाते. म्हणजे मोदींना चूक झाल्याचं मान्य आहे का?, असा सवाल काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विचारला. मोदींनी माफी नेमकी कशाबद्दल मागितली? संघाच्या माणसाला अनुभव नसतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम दिलं त्याबद्दल मोदींनी माफी मागितली की पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला, त्याबद्दल मोदींनी क्षमा मागितली, असे प्रश्न राहुल यांनी सांगलीतील सभेत विचारले आहेत.