Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षांमध्ये सुरू आहे. मात्र या जागावाटपात सर्वात मोठे आव्हान भाजपसमोर असणार आहे.
महाराष्ट्रातील गेल्या दोन विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर २०१४ साली भाजपने २६० जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यांना १२२ जागा मिळाल्या होत्या. तर २०१९ साली १६४ जागांवर निवडणूक लढवून त्यांना १०५ जागा मिळाल्या होत्या. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे याबाबत कोणाचेही दुमत नाही. राज्यातील २४० जागांवर भाजपची स्थिती चांगली आहे. हीच पक्षाची ताकद आहे. पण २०२४च्या निवडणुकीत पक्षासमोर आव्हान वेगळे आहे. गेल्या म्हणजे २०१९च्या निवडणुकीत भाजपने ज्या जागा जिंकल्या आणि ज्या जागांवर ते दुसऱ्या क्रमांकावर होते त्या जागा स्वत:कडे ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. कारण या ठिकाणी पक्षाचे उमेदवार तिकीट मिळेल या आशेवर असतील.
महायुतीच्या जागावाटपात भाजप जर १६४च्या खाली आले तर त्यांच्या अडचणी वाढतील. ज्या भाजप नेत्यांना तिकीट मिळणार नाही त्यांच्या समोर महायुतीच्या उमेदवाराला स्विकारणे किंवा अन्य पक्षाकडून निवडणूक लढवणे असे दोन पर्याय असतील.
२०१९ साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने १२४ जागांवर निवडणूक लढवली आणि त्यांना फक्त ५६ जागा मिळाल्या. आता यावेळी भाजपवर शिंदे आणि अजित पवार यांना पुरेशा जागा देण्याचा दबाव असेल. या शिवाय काही छोटे पक्ष आहे ज्यांच्यासाठी जागा सोडावी लागेल, ज्यात रवी राणा, महादेव जानकर, आरएसपी सारख्या पक्षांचा समावेश होतो. २०१९ च्या निवडणुकीत २३ जागांवर भाजपचा ८ हजारपेक्षा कमी मतांनी पराभव झाला होता. या जागांचा विचार केला तर भाजपची १२८ जागांवर दमदार कामगिरी झाली होती. आता यापैकी किती जागा ते यावेळी स्वत:कडे राखतात हे पाहावे लागले.
२०१९च्या निवडणुकीत ५ हजार पेक्षा कमी मतांनी झालेला पराभव
राष्ट्रवादी काँग्रेस- ०९ जागा
शिवसेना- ०४ जागा
काँग्रेस- ०४ जागा
भाजप- १४ जागा
विधानसभा निवडणुकीत भाजप समोरचे सर्वात मोठे आव्हान; स्वबळावर लढलो तर बंपर फायदा अन् महायुतीत पाहा काय होणार
यावेळी भाजपने १४० जागांवर निवडणू्क लढवली तर २० मतदारसंघात भाजपचे नेते पक्ष सोडू शकतात. कारण या ठिकाणी संबंधित उमेदवार पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर होते. २०१४ तुलना केली तर ही संख्या ४२वर जाईल. भाजपला स्वत:चे उमेदवार आणि नेत्यांची नाराजी आणि बंडखोरी रोखण्याचे आव्हान असेल.