Maharashtra Election 2024: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला. महाविकास आघाडी आमच्याच पक्षातील माणूस फोडण्याचे काम करत असल्याचे शेळके म्हणाले.
मावळ तालुक्यातील वडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनील शेळके हे ग्रामदैवत पोटोबा महाराज यांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच महाविकास आघाडीला टोला देखील लगावला आहे.
यावेळी सुनील शेळके यांनी बोलताना सांगितले की, आज मला पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ती माझ्या कामाच्या जोरावर सर्वसामान्य नागरिकांच्या पाठिंब्याने देण्यात आली आहे. मागच्या पाच वर्षात जी कामे झाली. तालुक्याला एका उंचीवर नेण्याचा मी प्रयत्न केला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी आणि तालुक्याला एका उंचीवर नेण्यासाठी पक्षाकडून पुन्हा एकदा मला संधी देण्यात आली आहे. तसेच आमच्यातली बंडखोरी रोखण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहे. माझ्या पक्षातील वरिष्ठ नेते याबाबत बैठक घेऊन इच्छुक उमेदवारांची समजूत घालण्याचा प्रयत्न करणार आहेत.
महाविकास आघाडीकडे अद्यापही मावळ तालुक्यात उमेदवार नाही. त्यामुळे आमच्या पक्षातीलच उमेदवार फोडायचा व त्याला उमेदवारी द्यायची असा प्रयत्न महाविकास आघाडी कडून केला जात आहे. मात्र जे इच्छुक आहेत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या पक्षातील वरिष्ठ नेते करणार आहे. महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणूनच माझी निवड करण्यात आली. त्याबद्दल मी माझ्या वरिष्ठ नेत्यांचे जाहीर आभार मानतो.