विधानसभा निवडणुकीआधी राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला दिसत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची यादी जाहीर झाली असून त्यामध्ये पुण्यामधील वडगाव शेरीच्या विद्यमान आमदारांचे नाव नसल्याने त्यांचा पत्ता कट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच यावर बोलताना सुनील टिंगरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ही पहिली यादी आहे अंतिम नाही, मला अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल या सर्व नेत्यांनी फोन केलाय. मला अजित पवारांनी एबी फॉर्म दिलाय. मी निवडणूक लढणार आहे. माझी उमेदवारी फायनल असल्याचं मला सांगितलं आहे. मैत्रिपूर्ण लढत होणार असेल त्याबाबत अजितदादा निर्णय घेतील. माझ्यासमोर कोणता पक्ष आहे किंवा कोणता चिन्ह आहे पाहत नाही, कारण मी फक्त विकासकामावर निवडणूक लढतो, अशी प्रतिक्रिया देत सुनील टिंगरे देत वडगाव शेरी मदारसंघाचा सस्पेन्स संपवला आहे.
या मतदारसंघात आतापर्यंत मी जितका निधी आणलाय याआधी कोणत्याही आमदाराने तेवढा आणलेला नाही. जनतेला काम करणारा माणूस लागतो. १५१० कोटींचा निधी मी आणलेला असून त्यामध्ये अनेक मोठे उपक्रम केले आहेत. शरद पवारांनी माझ्यावर टीका केली. मात्र शरद पवार माझ्यासाठी आदरणीय त्यांना माझा कान पकडण्याचा अधिकार असल्याचंही सुनील टिंगरेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, वडगाव शेरी मतदारसंघामध्ये भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना उमेदवारी हवी आहे. मात्र महायुती असल्याने तिथे दादा गटातील सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत. पार्शे कार अपघात प्ररकरणावेळी टिंगरे यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे या विधानसभेला टिंगरे यांचे तिकिटे कापले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.