Mumbra Kalwa Assembly constituency : आव्हाडांच्या विरोधात अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला रिंगणात उतरले आहेत.
हायलाइट्स:
- कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट लढत होणार
- जितेंद्र आव्हाड हे कळवा मुंब्रा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून त्यांनी सलग तीन टर्म निवडणूक जिंकली आहे.
- नजीब मुल्ला हे अजित पवार यांचे निकटवर्तीय असून त्यांनी कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात उमेदवारी जाहीर केली आहे.
कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील मुंब्रा हा मुस्लिमबहुल परिसर असून कळव्यात मात्र मराठी आणि आगरी मतदार जास्त प्रमाणात आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद देखील जास्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची संख्या देखील या ठिकाणी जास्त आहे.
राष्ट्रवादीमध्ये फूट फुडल्यानंतर मुख्य राष्ट्रवादी पक्षातील नगरसेवक विभागल्याने कळवा मुंब्रा मतदारसंघात राजन किणे आणि प्रकाश बर्डे हे दोन माजी नगरसेवक वगळता या मतदारसंघातील बहुतांश नगरसेवक हे जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतच आहेत. तर ठाण्यातील दोन पॅनलमधील मूळ राष्ट्रवादीमधील माजी नगरसेवक अजित पवार यांच्यासोबत गेले असून यामध्ये नजीब मुल्ला यांचा समावेश आहे.
Najeeb Mulla : कळवा मुंब्य्रात अजित दादांची फील्डिंग, जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात शिष्यालाच मैदानात उतरवलं
शरद पवार गटाचा प्रभाव
कल्याण लोकसभा क्षेत्रात येत असलेला कळवा मुंब्रा हा विधानसभा मतदार २००९ साली संघ तयार झाल्यानंतर या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक लढवून राष्ट्रवादीचा पहिल्यांदा झेंडा फडकावला. तेव्हापासून जितेंद्र आव्हाड हेच या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे शरद पवार गटाचा प्रभाव या मतदारसंघात जास्त आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना या मतदार संघातून चांगला लीड मिळाला आहे. मात्र आता अजित पवार गटाने या मतदारसंघाला सुरुंग लावण्याचे काम सुरु केले असून मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी आणून आव्हाडांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्याचे नियोजन अजित पवार गटाने केले आहे.