Flower Market: पावसामुळे जिल्ह्यातील झेंडू पिकाचे सुमारे ७० ते ७५ टक्के नुकसान झाले. त्यामुळे यंदा लक्ष्मीपूजनासाठी झेंडू महागण्याची शक्यता उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रकाशपर्वाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे बाजारपेठांमध्ये नाशिककरांची रेलचेल वाढली आहे. नवीन कपडे, वाहने, इलेक्ट्रीक वस्तूंसह गृहसजावटीच्या वस्तू आणि दिवाळीच्या फराळालाही मोठी मागणी आहे. ग्राहकांमुळे बाजारपेठांत पाय ठेवायला जागा नाही, तर दुसरीकडे अवकाळीमुळे झेंडू पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. बाजारपेठेत सद्यस्थितीला इतर फुलांसह झेंडूचीही आवक घटली आहे. त्यामुळे झेंडूला प्रतिक्रेट अडीचशे ते तीनशे रुपयांचा दर मिळत आहे. मात्र, लक्ष्मीपूजनला झेंडूंची मागणी दुपटीहूनही अधिक वाढणार आहे. त्यामुळे दरांतही वाढ होण्याची शक्यता आहे. दसऱ्याला झेंडूसाठी तीनशे ते चारशे रुपये क्रेटचा दर मिळाला होता. लक्ष्मीपूजनला यात वाढ होऊन दर पाचशे रुपये क्रेटपर्यंत जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरात सद्यस्थितीला मखमलाबाद, मातोरी, मुंगसरेसह इतर भागांतूनही झेंडूंची आवक होत आहे.
अपेक्षांवर पाणी
पावसाने होणाऱ्या नुकसानीमुळे यंदा झेंडूची लागवडही कमी झाली होती. त्यामुळे दसऱ्याला झेंडूला ३०० ते ४०० रुपये क्रेटचा दर मिळाला. दिवाळीतही उत्तम दर मिळण्याची अपेक्षा असताना गेल्या अवकाळीमुळे अपेक्षांवर पाणी फेरल्याचे उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
उत्पन्नाची हमी नसल्यामुळे यंदा झेंडूची लागवड कमी झाली. यातच पावसाळ्यातही फूलशेतीचे नुकसान झाले. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे झेंडूचे सुमारे ७० ते ७५ टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनला झेंडूला अधिकचा दर मिळण्याची अपेक्षा आहे.- सदाशिव मेहंदळे, शेतकरी
यंदा दसऱ्याला झेंडूचे दर वाढलेले होते. अवकाळीमुळे आता आवक कमी झाली आहे. त्यामुळे फूल बाजारात झेंडूही महाग झाला आहे. लक्ष्मीपूजनाला झेंडूच्या मागणीत मोठी वाढ होईल. दर पाचशे रुपये प्रतिक्रेटपर्यंत जाण्याची शक्यता आहे.- महेंद्र दिवे, व्यावसायिक