Nagpur Airport: दिवाळी यंदा २८ ऑक्टोबर वसूबारसपासून ते ३ नोव्हेंबर भाऊबीजपर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर ‘मटा’ने विविध शहरातील विमानसेवेच्या तिकिटांचे दर पाहिले असता नेहमीच्या तुलनेत दर अव्वाच्या सव्वा वाढलेले आढळले.
दिवाळी यंदा २८ ऑक्टोबर वसूबारसपासून ते ३ नोव्हेंबर भाऊबीजपर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर ‘मटा’ने विविध शहरातील विमानसेवेच्या तिकिटांचे दर पाहिले असता नेहमीच्या तुलनेत दर अव्वाच्या सव्वा वाढलेले आढळले. २८ ऑक्टोबरला मुंबई-नागपूर विमानाचा दर १८ ते २० हजार रुपयांपर्यंत आहे. पुणे-नागपूर ११ ते १३ हजार, हैदराबाद-नागपूर १४ हजार असा दर दाखवित आहे. तर ४ नोव्हेंबरला नागपूरहून परत जाऊ इच्छिणाऱ्यांना नागपूर-पुणे यासाठी १२ ते १३ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. त्याशिवाय, नागपूर-दिल्ली १२ हजार, नागपूर-मुंबई १३ ते १६ हजार, नागपूर-हैदराबाद १७ हजार रुपये दर आहे.
याबाबत टूर्सच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, सण-उत्सवाचे दिवस वगळता इतर दिवसांमध्ये विमानाच्या तिकिटाचे दर तुलनेने कमी असतात. दिवाळीनंतर १५ दिवसांनी दर कमी होतील. त्यानंतर डिसेंबरच्या अंतिम आठवड्यात दर वाढणार आहेत. ही परिस्थिती दरवर्षी असते. परंतु, गो फर्स्ट एअरलाइन्सच्या विमानांचे संचालन बंद पडले. परिणामत: इंडिगो एअरलाइन्सने याचा फायदा घेत दरवाढ केली आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. सध्या इंडिगोची मक्तेदारी निर्माण झाली आहे. त्याचा फायदा घेत दर प्रचंड वाढविण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे प्रवासी संतप्त आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यावेळी झालेली दरवाढ ग्राहकांना परवडणारी नाही.
इंधन स्वस्त होऊन फायदा काय?
अलीकडेच तेलाच्या किंमतीत झालेली घसरण यामुळे विमानाचे प्रवास भाडे कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. प्रत्यक्षात इंधन स्वस्त होण्याचा ग्राहकांना काहीही फायदा झालेला नाही. गेल्यावर्षी मर्यादित क्षमतेमुळे दिवाळीच्या आसपास विमान भाड्यात वाढ झाली होती. ज्याचे मुख्य कारण म्हणजे गो फर्स्ट एअरलाइनचे निलंबन होते. यावर्षी अतिरिक्त क्षमतेची भर पडल्याचे सांगण्यात येत असले तरी दरांकडे पाहता ग्राहकांना फारसा दिलासा दिसून येत नाही.