Maharashtra Election 2024: विधासनभा निवडणुकीत अक्कलकुवा मतदारसंघातून काँग्रेस आणि शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. या मतदारसंघातून सर्व इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
राज्यातील प्रथम क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्या अक्कलकुव्यात महाआघाडीतर्फे ही जागा काँग्रेसला मिळाली आहे. तर महायुतीतर्फे शिंदे शिवसेनेला देण्यात आली आहे. काँग्रेस तर्फे ॲड.के.सी.पाडवी यांना तर शिंदे शिवसेनेततर्फे आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली. अशा असताना ही जागा आम्हाला मिळावी. अशी मागणी करत भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. हिना गावित यांनी भाजपातर्फे व अपक्ष असे दोन नामांकन दाखल केले. त्यातच हा शेवटच्या दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे रतन पाडवी यांनीही उमेदवारी दाखल केली.
महायुतीतील बिघाडी एवढ्यावर न थांबता शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष किरसिंग वसावे यांनीही पक्षातर्फे तसेच अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे महायुतीत मोठ्या प्रमाणावर बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे. असे असताना महाआघाडी तर्फे काँग्रेस तर्फेच उमेदवारी दाखल करण्यात आली होती. मात्र शेवटच्या दिवशी उबाठातर्फे महिला जिल्हाध्यक्ष रीना पाडवी यांच्यासह जिल्हा परिषद सभापती तथा माजी जिल्हा प्रमुख गणेश पराडके यांनीही अपक्ष उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीप्रमाणेच महाआघाडीतील बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एकही जागा न मिळाल्याने तसेच काँग्रेस विश्वासात घेत नसल्याचे कारण देत. जिल्हाभर काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचे जिल्हा युवक अध्यक्ष संदीप परदेशी यांनी याआधी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील प्रथम क्रमांकाचा मतदार संघात 17 अर्ज दाखल करण्यात आले आहे.
शिंदे शिवसेनेतील विरोधक आले जवळ
अक्कलकुवा मतदारसंघात शिंदे शिवसेनेत दोन गट होते. एक गट विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी तर दुसरा गट माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाध्यक्ष किरसिंग वसावे , विजयसिंग पराडके यांचा होता. दरम्यान आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी मिळवण्यासाठी आमदार आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
आज शेवटच्या दिवशी आमदार आमश्या पाडवी यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी दाखल केली. त्यावेळी माजी आ. चंद्रकांत रघुवंशी उपस्थित होते. तर अक्कलकुवा जिल्हाध्यक्ष किरसिंग वसावे , विजयसिंग पराडके अनुपस्थित राहिले.विजयसिंग पराडके व किरसिंग वसावे काय भूमिका घेतात हे आगामी काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. मात्र शिंदे शिवसेनेतील विरोधक असलेले आमदार आमश्या पाडवी व चंद्रकांत रघुवंशी एकत्र आले आहेत.