Nagpur Central Vidhan Sabha : मध्य नागपुरातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर पाच तास हा प्रकार सुरू होता, त्यानंतर रात्री आठ वाजल्यानंतर अनीस अहमद बाहेर आले आणि त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले.
आपल्या विरोधात मोठा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप अनीस अहमद त्यांनी केला. मध्य नागपुरातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर पाच तास हा प्रकार सुरू होता, त्यानंतर रात्री आठ वाजल्यानंतर अनीस अहमद बाहेर आले आणि त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले.
काँग्रेस सोडून वंचित प्रवेश
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनीस अहमद यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसची साथ सोडून मुंबईत वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश घेतला. वंचितकडून मध्य नागपूर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या.
मंगळवारी दुपारी तीन वाजून दोन मिनिटांनी ते उमेदवारी अर्ज भरायला आरओ कार्यालयात पोहोचले. त्यांना दोन मिनिटे उशीर झाला. त्यानंतर दुपारपासून रात्री जवळपास आठ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अर्जाबाबत निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली. अखेर त्यांचा अर्ज स्वीकार करण्यात आलेला नाही.
तब्बल पाच तासांनंतर ते तेथून बाहेर पडले. आता त्यांना वेळेचं भान राहिलं नाही, की त्यांना अर्ज भरायचाच नव्हता अर्शा चर्चा रंगल्या आहेत. मात्र अनीस अहमद अर्ज भरण्यापासून ‘वंचित’ राहिले हे खरं.
तिरंगी लढत नाहीच
मध्य नागपूरच्या जागेवर भाजपचे प्रवीण दटके आणि काँग्रेसचे बंटी शेळके यांच्यात थेट लढत होणार आहे. अनीस अहमद यांचा निवडणूक रिंगणात प्रवेश झाल्याने उत्सुकता वाढली होती, मात्र आता थेट दोन उमेदवारांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. अनीस अहमद यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने अनेक चर्चा सुरू होत्या. आता ते उमेदवारी दाखल करू शकले नाहीत.
अहमद आता काँग्रेस पक्षातही नाही. मध्य नागपूरच्या जागेवर मुस्लिम उमेदवार न दिल्याबद्दलही अहमद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यांच्या मते या जागेवर निर्णायक भूमिका बजावणाऱ्या मुस्लिम समाजाचा उमेदवार न दिल्याने त्यांच्या जुन्या पक्षाने समाजावर अन्याय केला आहे. मंगळवारी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले मात्र चर्चा बहुतांशी अनीस अहमद यांच्या उमेदवारीचीच होती.