Mumbai BEST Bus Diwali Bonus: दरवर्षी दिवाळीच्या आधल्या दिवशी होणारा बेस्ट कर्मचाऱ्यांचा होणारा बोनस यावेळी मात्र होऊ शकलेला नाही. बोनस देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून बुधवारी दिवसभर निधीची जुळवाजुळव सुरूच होती आणि यासाठी बैठका होत होत्या.
यंदा मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचारी, अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, महापालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक, माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित आणि विनाअनुदानित), माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक, अध्यापक शाळेतील शिक्षण सेवक, अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते आणि शिक्षकेतर कर्मचारी, अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक यांना २९ हजार रुपये बोनस मिळाला. गेल्या वर्षी अधिकारी, कर्मचाऱ्यांना २६ हजार रूपये बोनस दिला होता. यंदा यामध्ये वाढ करण्यात आली.
सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना १२ हजार रुपये, तर बालवाडी शिक्षिका, मदतनीस यांना प्रथमच भाऊबीज भेट देताना पाच हजार रुपये देण्यात आले. मुंबई महापालिकेप्रमाणेच बेस्टच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही दरवर्षी बोनस मिळतो आणि हा बोनस यावेळी मिळावा, अशी मागणी बेस्ट उपक्रमाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. त्यामुळे आठवड्याभरापूर्वीच बेस्ट उपक्रमाने मुंबई महापालिकेकडे ८० कोटी रुपये निधीची मागणी केली होती. त्यामुळे बोनसची कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा होती. दरवर्षी दिवाळीच्या आधल्या दिवशी बोनस मिळतो. मात्र बुधवारपर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस झाला नव्हता. यासंदर्भात बुधवारी बेस्ट उपक्रमातही बैठका सुरू होत्या.
महापालिकेची असमर्थता
विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेमुळे निधी उपलब्ध करू शकत नसल्याचे महापालिकेकडून बेस्टला कळवण्यात आले. बोनससाठीचा हा निधी आचारसंहितेनंतर देण्याचा विचार करू, असेही महापालिकेने बेस्टला स्पष्ट केले. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा बोनसविनाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेस्टमध्ये सध्या २५ हजारपेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी आहेत.