Sharad Pawar Criticize NCP Ajit Pawar Leaders: शरद पवार यांचे गोविंदबाग हे निवासस्थान शुक्रवारी गर्दीने फुलून गेल्याचे दिसून आले. शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारीही पक्षफूटीवर भाष्य करत सत्तेत जाणाऱ्यांना चिमटे काढले.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, राज्यातील जनतेने गतवेळी आपल्याला ५४ जागा दिल्या. पण सत्तेचा गैरवापर करत हे सरकार स्थापन झाले. एक काळ असा होता की, विकासात महाराष्ट्र क्रमांक एकवर होते. आज ते सहाव्या स्थानी गेले. ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांना सत्तेची जाण नाही. जिल्ह्यातील सामान्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी आपण त्यांना पदे दिली. कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून ते मंत्री झाले, पण त्याची आठवण आपल्या सहकाऱ्यांना राहिलेलं नाही, या शब्दांत पवार यांनी टोले लगावले.
१९८० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत माझ्या विचाराचे ५८ आमदार निवडून आले होते. कामानिमित्त इंग्लंडला गेलो असता यातील ५२ आमदार सोडून गेले. नंतर झालेल्या निवडणुकीत ५८ पैकी ५२ लोक पराभूत झाले असल्याची आठवण पवार यांनी यावेळी करून दिली. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे त्यामुळे शिरूर मध्ये अशोक पवार निवडून येतील असा विश्वास शरद पवार त्यांनी व्यक्त केला. साखर कारखानदारी आपण उभी केली, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, त्यामुळे महाराष्ट्र साखर धंद्यातील महत्त्वाचे राज्य झाले. राज्यात सत्तांतर होणार आहे. सत्ता आल्यानंतर शिरूरचा घोडगंगा साखऱ कारखाना कसा सुरू होत नाही, ते मी बघतो, असेही शरद पवार म्हणाले. शिवाय जो विरोधात आहे, त्याला अडचणीत आणणे अशी सध्याच्या नेत्यांची भूमिका असल्याची टीका त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली. तुतारी चिन्हाऐवजी ट्रम्पेट असाच उल्लेख होणार असल्याने याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.