Ajit Pawar Supriya Sule: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता पवार कुटुंबात बरीच मोठी फूट पडल्याचं दिसत आहे. यंदा प्रथमच कुटुंबात दोन पाडवे साजरे झालेले आहेत.
राजकीय मतभेद असले तरीही पवार कुटुंब एक राहील, त्यांची दिवाळी सोबत जाहीर होईल, असं म्हटलं जात होतं. पण प्रत्यक्षात मात्र तसं घडताना दिसत नाही. आज वेगवेगळे पाडवे साजरे करणारे शरद पवार आणि अजित पवार उद्या भेटतील याची शक्यता जवळपास धूसर झाली आहे. त्यामुळे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भाऊबीज होण्याची शक्यता मावळली आहे. दोन्ही भावंडांचे दिवसभरातील कार्यक्रम पाहता भाऊबीज साजरी होणं अवघड आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा बारामतीमधून लढत आहेत. उद्या त्यांचा गावभेट दौरा आहे. सकाळी सातपासून गावभेट दौरा सुरु होईल. दौऱ्याची सांगता रात्री आठ-साडे आठच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. या कालावधीत अजित पवार २७ गावांना भेटी देतील. त्याची सुरुवात वंजारवाडीपासून सकाळी होईल. अजित पवारांचा भरगच्च दौरा पाहता ते भाऊबीजेसाठी वेळ काढण्याची शक्यता कठीण आहे. त्यामुळे पाडव्यापाठोपाठ भाऊबीज सोहळ्यालाही संपूर्ण पवार कुटुंब सोबत नसेल.
पवार कुटुंबाची एकत्र भाऊबीज काटेवाडीत व्हायची. त्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित असायचं. पण उद्याची भाऊबीज शरद पवारांच्या गोविंदबागेत होईल. हा कार्यक्रम झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळ पक्षाच्या कामासाठी कोल्हापूरला जाणार आहेत. संध्याकाळी ४ वाजता त्या बारामतीहून कोल्हापूरला रवाना होतील. तिथे त्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. त्यामुळे संध्याकाळी त्या बारामतीत नसतील. तर अजित पवार दिवसभर गावभेट दौरा करतील.