Bhaubeej Brother Death : निलकंठ याला सख्खी बहीण नाही. त्याला चुलत बहीण ओवाळणी करत असते. भाऊबीजेला तो कुठेही असला तरी ओवाळणीसाठी तो गावाकडे येत असे
ही दुदैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात घडली आहे. अक्षय निलकंठ वाढई (वय २५ वर्ष) असं मृतक भावाचे नाव आहे. तो वरोरा तालुक्यातील डोंगरगाव येथून चेक आष्टा गावाकडे येत होता. यावेळी वाटेत काळाने त्याच्यावर घाला घातला.
कसा झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील अक्षय निलकंठ वाढई हा वरोरा तालुक्यात येणाऱ्या डोंगरगाव येथे खाजगी कंपनीत काम करत होता. भाऊबीजेच्या निमित्ताने तो चेक आष्टा गावाकडे दुचाकीने निघाला होता. डोंगर हळदी गावानजीक असलेल्या वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याचा अपघात झाला.
या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Chandrapur Accident : लाडाची बहीण वाट बघत राहिली, भाऊबीजेला येतानाच दादावर काळाचा घाला, रस्त्यातच भावाने जीव सोडला
लाडाच्या बहिणीवर शोककळा पसरली
निलकंठ याला सख्खी बहीण नाही. त्याला चुलत बहीण ओवाळणी करत असते. भाऊबीजेला तो कुठेही असला तरी ओवाळणीसाठी तो गावाकडे येत असे. मात्र यावेळी ओवाळणी व्हायच्या आधी त्याने जीव सोडला. या घटनेने कुटुंबासह मित्र परिवार आणि शेजाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे. पुढील तपास पोंभूर्णा येथील पोलिस उपनिरीक्षक धनराज सेलोकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोराव नैताम, नरेश निमगडे करीत आहेत. भाऊबीजेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.