Satej Patil: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमा राजे यांनी अचानक माघार घेतली. त्यामुळे सतेज पाटील संतापले. त्यांनी त्यांचा राग शाहू महाराजांसमोर व्यक्त केला.
उत्तर कोल्हापुरातून काँग्रेसनं आधी राजेश लाटकर यांनी तिकीट दिलं. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी उमेदवारीस विरोध केला. पक्ष कार्यालयावर दगडफेक झाली. मग पक्षानं लाटकर यांचं तिकीट रद्द करत खासदार शाहू महाराज यांच्या सूनबाई मधुरिमा राजे यांना संधी दिली. त्यानंतर लाटकर यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला. खासदार शाहू महाराज, सतेज पाटील यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला.
माझ्यामुळे राजघराण्यात खासदारकी आहे. आता आमदारकीदेखील आमच्याच घरात आल्यास त्यामुळे चुकीचा संदेश जाईल, अशी भूमिका शाहूंनी घेतली. त्यांनी लाटकरांशी संपर्क साधला. दुपारी अडीचपर्यंत तुम्ही अर्ज मागे घ्या. तुम्ही माघार न घेतल्यास आम्ही २ वाजून ३५ मिनिटांनी अर्ज मागे घेऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली. लाटकरांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे मधुरिमा राजे अर्ज मागे घेण्यास गेल्या.
या सगळ्या घटनांबद्दल सतेज पाटील अनभिज्ञ होते. त्यांना हा प्रकार समजताच ते सभा सोडून तडकाफडकी निघाले. त्यांनी शाहू महाराजांची भेट घेतली. अर्ज मागे घेण्यास गेलेल्या मधुरिमांना ते शोधत होते. त्या एका केबिनमध्ये बसल्या होत्या. तिथे जाऊन सतेज पाटील यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. लढायचंच नव्हतं तर तसं सांगायचं होतं. मला तोंडावर पाडायची काय गरज होती, असा सवाल त्यांनी विचारला.
Satej Patil: शाहू महाराजांसमोर मधुरिमांची माघार, सतेज पाटील भडकले; कोल्हापुरातील राड्यामागे खरं कारण काय?
तितक्यात त्या केबिनमध्ये मधुरिमा राजे यांचे पती मालोजीराजे पोहोचले. त्यांनी मधुरिमा यांचा हात धरला आणि तिथून त्यांना घेऊन थेट अधिकाऱ्यांसमोर पोहोचले आणि अर्ज माघारी घेतला. घडलेल्या प्रकारामुळे संतापलेले सतेज पाटील तिथून निघाले. कारकडे जाताना त्यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. लढायची हिंमत नव्हती, तर आधीच सांगायचं ना. मी माझी ताकद दाखवली असती, असं म्हणत ते कारमध्ये बसले आणि पत्रकारांशी काहीही न बोलता थेट निघून गेले.