तुम्ही मला न्याय देणार होतात ना? शाहू महाराजांना एक फोन अन् मधुरिमांचा अर्ज मागे; काय घडलं?

Kolhapur Politics: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काल अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेस बंडखोर राजेश लाटकरांनी माघार न घेतल्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनीच माघार घेतली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काल अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेस बंडखोर राजेश लाटकरांनी माघार न घेतल्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनीच माघार घेतली. त्यांनी अर्ज मागे घेतल्यानं काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवली. त्यामुळे कोल्हापूर काँग्रेसचा चेहरा असलेले सतेज पाटील प्रचंड संतापले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. उमेदवारी नको होती, तर तसं सांगायला हवं होतं. मला अशाप्रकारे तोंडघशी पाडायची काय गरज होती, असा सवाल त्यांनी विचारला.

काँग्रेसनं कोल्हापूर उत्तरमधून आधी राजेश लाटकरांना तिकीट दिलं होतं. पण त्यानंतर काही माजी नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या. त्यांच्या उमेदवारीस विरोध दर्शवला. यानंतर पक्षानं लाटकरांचं तिकीट कापून खासदार शाहू महाराज यांच्या सूनबाई मधुरिमाराजे यांना संधी दिली. पण त्यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं पक्षाची गोची झाली. सतेज पाटील यांना विश्वासात न घेता हा सगळा प्रकार झाला. त्यामुळे त्यांचा प्रचंड संताप झाला. या सगळ्या घटनाक्रमाचे साक्षीदार असलेले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुनील मोदी यांनी संपूर्ण प्रकार कथन केला. तो त्यांच्याच शब्दांत खाली देत आहोत.
Satej Patil: शाहू महाराजांसमोर मधुरिमांची माघार, सतेज पाटील भडकले; कोल्हापुरातील राड्यामागे खरं कारण काय?
कोल्हापूर उत्तरमध्ये सुरुवातीला राजेश लाटकरांची उमेदवारी जाहीर झाली होती. पण काही अपरिहार्य कारणांमुळे ती उमेदवारी बदलली गेली आणि मधुरिमा राजे यांची उमेदवारी जाहीर झाली. राजेश लाटकरांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. तो त्यांनी मागे घ्यावा अशी विनंती करण्यासाठी स्वत: शाहू महाराज, मालोजीराजे आणि मधुरिमाराजे १ तारखेला त्यांच्या घरी भेटायला गेले होते. त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो.

सगळी चर्चा झाल्यानंतर राजेश लाटकरांचे वडील भरत लाटकर यांनी शाहू महाराजांना एक प्रश्न विचारला की माझ्या मुलाला महाराज न्याय देतील का? कारण शाहू महाराजांची आणि त्यांच्या गादीची ख्याती आहे की ते सामान्यांना न्याय देतात. जर यावेळी तुम्ही मला न्याय दिला नाही तर कोल्हापूरचा पुरोगामी विचार कुठेतरी दबला जातोय का, असं वक्तव्य भरत लाटकरांनी केलं होतं. त्यावर शाहू महाराज मोठ्या मनानं म्हणाले, मी एकच न्याय देऊ शकतो. माझ्या सुनेचा अर्ज माघारी घेऊन तुमच्या मुलाला पाठिंबा देऊ शकतो.
बंडखोर ठाम, म्हणून अधिकृत उमेदवाराचीच माघार; मविआला कोल्हापुरात मोठा धक्का
त्यावर आम्ही शाहू महाराजांना समजावलं. राजू लाटकरांना विनंती केली त्यांनी माघार घ्यावी. राजू लाटकर पावणे तीनला अर्ज मागे घेऊन आम्हाला पाठिंबा देतील, अशी खात्री आम्हाला होती. पण राजू लाटकरांच्या वडिलांनी भरत लाटकरांनी दुपारी २ वाजता शाहू महाराजांना फोन केला. तुम्ही मला न्याय देणार होतात त्याचं काय झालं?, असा प्रश्न त्यांनी महाराजांना विचारला.

तुम्ही मला न्याय देणार होतात ना? शाहू महाराजांना एक फोन अन् मधुरिमांचा अर्ज मागे; काय घडलं?

महाराजांना मागचा पुढे कसलाही विचार न करता भरत लाटकरांना सांगितलं, मी आता माझ्या सुनेला माघार घ्यायला लावतो आणि तुमच्या मुलाला मी पाठिंबा देतो. या घटनेचा एकमेव साक्षीदार मी होतो. शाहू महाराजांनी गादीचा मान राखून पुरोगामित्व टिकवलेलं आहे आणि त्यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्या, असं पक्षाला सांगितलेलं आहे. एका सामान्य कार्यकर्त्यासाठी मधुरिमाराजेंनी माघार घेतलेली आहे. एवढा मोठा निर्णय केवळ महाराजच घेऊ शकतात. त्यांची गादीच घेऊ शकते.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

maharashtra electionsMaharashtra politicsrajesh latkarSatej Patilकाँग्रेसमधुरिमाराजेमहाराष्ट्र राजकीय बातम्यामालोजीराजेशाहू महाराजसतेज पाटील
Comments (0)
Add Comment