Sangli Politics: सांगली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सुधीर गाडगीळ यांच्याविरोधात काँग्रेसनं पृथ्वीराज पाटील यांना तिकीट दिलं आहे. त्यानंतर जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. त्यांनी माघार घेतली नसल्यानं मतदारसंघात तिरंगी लढत होईल.
सांगली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सुधीर गाडगीळ यांच्याविरोधात काँग्रेसनं पृथ्वीराज पाटील यांना तिकीट दिलं आहे. त्यानंतर जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. त्यांनी माघार घेतली नसल्यानं मतदारसंघात तिरंगी लढत होईल. अपक्ष निवडणूक लढून विजयी झालेल्या विशाल पाटलांनी जयश्री पाटील यांना पाठिंबा दिला आहे. जयश्री पाटील याच महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचं विशाल पाटील यांना जाहीर केलं आहे. विधानसभेतही सांगली पॅटर्न राबवणार असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
वसंतदादा पाटील यांच्या घराण्यावर काँग्रेस सातत्यानं अन्याय का करतंय, असा सवाल विशाल पाटील यांनी विचारला. सांगलीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव काँग्रेसचा उमेदवार करु शकत नाही. त्यामुळे अपक्ष लढणाऱ्या जयश्री पाटील यांना निवडून द्या, असं आवाहन त्यांनी केलं. जयश्री पाटील यांच्या प्रचाराला शुभारंभ होत असताना खासदार विशाल पाटील हजर होते.
जयश्री पाटील यांची उमेदवारी महाविकास आघाडीचीच उमेदवारी असल्याचं मी जाहीर करतो. कारण मी खासदार म्हणून महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. लोकसभा निवडणुकीला काँग्रेसचे ९९ उमेदवार निवडून आले. मी शंभरावा खासदार आहे. तशाच प्रकारे जयश्री पाटील शंभराव्या आमदार असतील, असं विशाल पाटील म्हणाले.
यावेळी विशाल पाटील यांनी एका वेगळ्याच पॅटर्नवर भाष्य केलं. ‘सांगली जिल्ह्यात २०१४ पासून एक पॅटर्न दिसून येतोय. गेल्या १० वर्षांत वसंतदादांच्या कुटुंबात एकही उमेदवारी देण्यात आलेली नाही. लोकसभेत आणि विधानसभेत फसवणूक झाली. आमच्या कुटुंबाचं नेमकं काय चुकलंय, ते कळत नाही. आमच्या कुटुंबाची निष्ठा कुठे कमी पडली का?’ असा प्रश्न त्यांनी विचारला.