Sangamner Assembly Constituency : संगमनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीट्या नेत्याचं टेन्शन वाढलं आहे. प्रचारासाठी आंबेडकरी तोफ धडाडणार असल्याने ते नेमका काय संवाद साधणार याकडे अनेकांचं लक्ष आहे.
महाविकास आघाडीसमोर वंचितचं आव्हान
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला मोठा फटका बसला होता. त्यांनंतर आघाडीच्या नेत्यांकडून वंचित भाजपची बी टीम असल्याच्या प्रतिक्रिया समोर आल्या. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असल्याने काँग्रेसची वोट बँक असलेले दलित मुस्लिम मतांचा विभाजन होत असल्याचे यापूर्वी अनेक काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचेही तगडे आव्हान असणार आहे. सध्या प्रकाश आंबेडकर ओबीसी, दलित मुस्लिम आदिवासींसाठी प्रामाणिक भूमिका मांडत असल्याने त्यांचा फॅक्टर या निवडणुकीत किती उपयोगी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं असेल.
मविआचा संभाव्य मुख्यमंत्री पदाचा चेहरा अडचणीत येणार?
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा संगमनेर मतदारसंघात सुरू आहेत. परंतु संगमनेर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून अमोल खताळ यांचं तगड आव्हान असून त्यांना विखे पिता – पुत्र बळ देत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीकडून अब्दुल अजीज ओहरा उमेदवारी करत असल्याने दलित मुस्लिम आदिवासी मतांचे विभाजन होऊन बाळासाहेब थोरात यांना याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाळासाहेब थोरात या निवडणुकीत अडचणीत येणार अशा चर्चा सध्या सुरू आहे.
थोरातांच्या बालेकिल्ल्यात सुजात आंबेडकरांची सभा
संगमनेर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल अजीज वोहरा यांच्या प्रचारार्थ वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर बुधवारी संगमनेर येथे विजयी संकल्प सभा घेणार असून सुजात आंबेडकर संगमनेरात येऊन काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मविआच्या अडचणी वाढणार! वंचितचा उमेदवार वाढवणार काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचं टेन्शन? संगमनेरात आंबेडकरी तोफ धडाडणार
प्रकाश आंबेडकरही प्रचारासाठी मैदानात उतरणार
गेल्या काही दिवसांपासून प्रकृती स्थिर नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर रुग्णालयात उपचार घेत होते, मात्र सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधार झाल्याने आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून लवकरच प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे.