Prakash Ambedkar on OBC Reservation Politics: राज्यात मराठा विरूद्ध मराठा असे चित्र निर्माण करण्यात आले. या बैठकांत मराठा आमदार कसे निवडून येतील यानुसारच आखणी करण्यात आली, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा जरांगेंवर ताशेरे ओढले आहेत
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने थांबवण्यात आले आहे. उद्या विधानसभेच्या माध्यमातून शिक्षण आणि नोकऱ्यांमधील आरक्षण थांबवले जाईल, हे आपल्याला मान्य आहे का? असा सवाल उपस्थिता करत ‘मान्य नसल्यास किंतु, परंतुची चर्चा न करता वंचित बहुजन आघाडीने उभे केलेल्या उमेदवारांना मतदान करा, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
‘जरांगे पाटील आणि शरद पवार यांची जी घोषणा आहे, २०० आमदार विधानसभेत असतील. याच्याच अंमलबजावणीला आता सुरुवात केली आहे. मराठ्यांनी मराठ्यांनाच मतदान दिले पाहिजे, असा त्यांचा निर्णय झाला आहे. आता ओबीसींनी आरक्षण वाचवण्यासाठी वंचितच्या उमेदवारांना मत देण्याची भूमिका घेतली पाहिजे. ही भूमिका जर बजावली तरच ओबीसींचे उमेदवार निवडून येतील, असे आंबेडकर यांनी अधोरेखित केले.
दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी धार्मिक प्रचारावरही सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, एक प्रचार निश्चित केला जाणार की, धर्म संकटात आहे. पण मी तमाम ओबीसींना विचारतो की, आपण आपल्या वाडवडिलांच्या, पूर्वजांचा धर्म सोडणार आहात का ? तो आपण मुघलांच्या काळात सोडला नाही, तर आताच्या काळात कसा सोडणार? ही चर्चा निरर्थक आहे. ही चर्चा भाजप, आरएसएस, बजरंग दल, हिंदू महासभा यांच्यामार्फत केली जाते. पण तुम्ही त्यांना विचारा की, तुम्ही आमच्या आरक्षणाच्या बाजूने का नाही. ओबीसी आरक्षणाचे समर्थन आपण का करत नाही. धोका धर्माला नसून आरक्षणाला आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले.