Sudhir Mungantiwar at Muslim Melava in Chandrapur: भाजप आणि महायुतीत असलेले काही घटक पक्ष अधूनमधून मुस्लिम बांधवावर टीकाटिप्पणी करीत असतात. कधीकधी या टीकेचा दर्जा फारच खालविलेला असतो. आता विधानसभा निवडणूकीचा धुराळा उडाला असताना या परिस्थितीत एक मत लाखमोलाचे आहे. हे ओळखून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाईचारा कायम ठेवल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीचा विजयाला हातभार लावला होता. काँग्रेसकडे त्यांचा कल असतो. तर दुसऱ्या आघाडीकडून देशातील मुस्लिम बांधवावर नको ते वक्तव्य करण्यात येत आहे. ही टीका करण्यात भाजपचे काही खासदार, आमदार आणि भाजपशी संलग्नित संघटना आघाडीवर असतात. नितेश राणे यांनी प्रक्षोभक भाषण करून मुस्लीम समाजाला धमकावले सुद्धा आहे. राज्यातील काही मतदारसंघात मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे, अशा मतदारसंघात त्यांची भूमिका निर्णायक ठरते. लोकसभेमध्ये बसलेला फटका पाहता भाजपने आता नमती भूमिका घेतल्याचे दिसत आहे. मुस्लिम मतदारांची शक्ती भाजपला कळली. त्याचमुळे मुस्लिम बांधवावर, त्यांचा श्रद्धास्थानावर आणि मुस्लिमांना पुढे करून काँग्रेसवर आगपाखड करणारे भाजप नेते आता मतासाठी हात जोडू लागल्याचे चित्र दिसत आहे. त्याची झलक चंद्रपुरात आज दिसली आहे.
खरंतर मुनगंटीवार यांनी जाती, धर्माचा पलीकडे जाऊन राजकारण केलं, असं चित्र असताना आता चर्चा होतेय ती त्यांच्या फेसबुक पेजवर टाकलेल्या रिलची. मुनगंटीवार बल्हारपूर मतदारसंघातून उभे आहेत. त्यांचा प्रचार जोरात सुरु आहे. बल्हारपूर येथे झालेल्या मुस्लिम महिला मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली. महिलांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसला चिमटे काढले आहेत. मात्र मुनगंटीवार यांच्या भाईचाऱ्याची चर्चा रंगली आहे. त्यांचा हा भाईचारा भाजपचा नेत्यांना किती रुचणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.